Republic Day 2022: दिल्लीचे राजपथ बनले 'शक्तीपथ'; जमिनीवर संस्कृती तर आकाशात दिसलं लष्कराचं सामर्थ्य
Republic Day 2022: देशाच्या राजधानीत आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. त्या सर्व कार्यक्रमांचा घेतलेला हा आढावा.
नवी दिल्ली: देशभरात आज 73वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दिल्लीच्या राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. राजपथावर झालेल्या ध्वजारोहणानंतर भारतीय लष्कराकडून तोफांची सलामी देण्यात आली. यावेळी सैन्यानं भारतीय राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी देण्यात आली. दिल्लीच्या राजपथावर आज भारतीय संस्कृतीचं तसेच लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन अवघ्या जगाला झालं.
ध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते वीरता पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी आज राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी देशाच्या शहीद सैनिकांना मानवंदनाही दिली. पंतप्रधान मोदींनी आज परिधान केलेल्या टोपीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ही टोपी उत्तराखंडमध्ये परिधान केली जाते. त्या टोपीवर ब्रह्मकमळ चितारण्यात आलं होतं.
ध्वजारोहणानंतर दिल्लीच्या राजपथावर वेगवेगळ्या राज्यांच्या चित्ररथांचं संचलन पार पडलं. राजपथावरचा महाराष्ट्राचा चित्ररथ हा जैवविविधता या संकल्पनेवर आधारीत होता. त्यात महाराष्ट्रातील जैवविविधतेचं दर्शन घडवण्यात आलं.
आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथावर एनसीसीच्या महिला कॅडेट्सचं संचलन पार पडलं. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींसह मान्यवरांना सलामी दिली. त्यानंतर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी उंटांसह पथसंचलन केलं. यावेळी जवानांकडून शिस्तबद्धतेचं दर्शन घडलं. भारत-पाक युद्धात महत्वाची कामगिरी बजावलेल्या शस्त्र आणि रणगाड्यांचाही राजपथावरील संचलनात समावेश होता. भारतीय जवानांनीही यावेळी शौर्याचं दर्शन घडवलं. दुचाकीवरुन जवानांनी केल्या कसरती लक्षवेधी ठरल्या.
राजपथावर हवाई दलाच्या कसरतींचंही दर्शन झालं. यावेळी लढाऊ विमान राफेलसह वेगवेगळ्या 75 विमानांच्या कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. संचलनावेळी अपाचे हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
राजपथावर गोवा राज्याच्या चित्ररथातून गोवन संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. आजच्या चित्ररथ संचलनामध्ये जलजीवन मिशन मंत्रालयाचा पाण्याचं महत्त्व सांगणारा चित्ररथ खास आकर्षण ठरला. पंजाबच्या चित्ररथातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यातलं पंजाबचं योगदान दिसून आलं. राजपथावर टोकिओ ऑलिम्पिकमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्यांचं योगदान हरयाणाच्या चित्ररथातून दिसून आलं.
जम्मू-काश्मीरच्या चित्ररथातून राज्यातल्या संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं. काशी विश्वनाथ धामची प्रतिकृती असलेला उत्तर प्रदेशचा चित्ररथ खास ठरला. उत्तराखंडच्या चित्ररथातून धार्मिक स्थळांचं चित्रण करण्यात आलं होतं. मेघालयच्या चित्ररथातून राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडलं. पंतप्रधान मोदींच्या गुजरातचा चित्ररथ हा आदिवासी चळवळीचे चित्रण करणारा ठरला. अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथातून स्थानिक संस्कृतीचं दर्शन घडलं
'आत्मनिर्भर भारत' आणि 'आझादी का अमृत महोत्सव' चा संदेश देणारा भारतीय नौदलाचा चित्ररथ खास ठरला. राजपथावर पॅराशूट रेजिमेंटच्या जवानांनीही शानदार संचलन केलं. 99 बँडवादकांनी राजपथावर खास संचलन केलं. 15 वेळेस सर्वोत्तम संचलनाचा पुरस्कार पटकावलेल्या दिल्ली पोलिसांच्या तुकडीचं संचलनही पार पडलं. सीमा भवानी या बीएसएफच्या महिला सैनिकांच्या पथकानं मोटरसायकलवर थरारक कसरती केल्या.
राजपथावर सादर करण्यात आलेला कर्नाटकचा चित्ररथ हस्तकला या थीमवर आधारीत होता. त्यानंतर छत्तीसगडच्या चित्ररथातून गोधन योजनेचं दर्शन घडलं. सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथातून योगी अरबिंदोंचा जीवनपट उलगडण्यात आला. त्यानंतर शिक्षा मंत्रालयाचा चित्ररथ हा शिक्षणपद्धतीतला आजवरचा प्रवास दर्शवणारा होता. राजपथावरचा डाक विभागाचा चित्ररथही खास ठरला. यात वेगवेगळ्या डाक विभागाच्या योजनांचा उल्लेख होता
वस्त्रोद्योग मंत्र्यालयाच्या चित्ररथात पारंपरिक वेशभूषेपासून आधुकतेपर्यंतचा प्रवास यात दिसून आला. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या चित्ररथातून उडाण योजना दर्शवण्यात आली. शौर्य त्याग आणि वीरतेची गाथा सांगणारा सीआरपीएफचा चित्ररथ खास ठरला. पथसंचलनात सामील झालेला जल शक्ती मंत्रालयाचा चित्ररथ पाणी हे जीवन आहे या संकल्पनेवर आधारित होता. लोक अदालत ही विधी आणि न्याय मंत्रालयाच्या चित्ररथाची थीम होती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha