Republic Day 2021: राजपथावर पहिल्यांदाच बांगलादेशी सैन्याच्या तुकडीची परेड, कारण...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथवर आयोजित पथसंचलनात पहिल्यांदाच बांग्लादेशच्या लष्कराच्या तुकडीचा आणि लष्करी बॅन्डचा समावेश करण्यात आला आहे. बांग्लादेशच्या या तुकडीत 1971 मध्ये त्या देशाच्या मुक्तीसंग्रामात भाग घेतलेल्या तीनही सैन्य दलाचा समावेश आहे.
नवी दिल्ली: आज भारतात 72 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने राजपथावर होणाऱ्या पथसंचलनाचे एक खास असे वैशिष्ट्य आहे. या पथसंचलनात बांग्लादेश लष्कराच्या एका विशेष तुकडीने भाग घेतला आहे. बांग्लादेशच्या सैन्याच्या 122 व्या तुकडीत लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या सैन्याचा समावेश आहे. या दलाचे नेतृत्व लेफ्टनंट कर्नल अबु मोहम्मद शाहनूर शॉनोन हे आहेत तर त्यांच्यासोबत लेफ्टनंट फरहान इशराक आणि फ्लाइट लेफ्टनंट सिबत रहमान यांचा समावेश आहे.
बांग्लादेश स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतलेली तुकडी पथसंचलनात भाग घेतलेल्या या तुकडीमध्ये 1971 मध्ये बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या युनिट्सच्या सैन्याचा समावेश होतो. या युद्धात मुक्ती वाहिनीचे सैन्य आणि भारतीय लष्कराने मिळून भाग घेतला होता. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये या दोन सैन्यांचा समावेश होता. त्यामुळे या दोन देशांच्या सैन्यादरम्यान एक वेगळंच नात निर्माण झाल्याचं पहायला मिळतंय.
बांग्लादेशच्या बटालियन 1, 2, 3, 4, 8, 9 , 10 आणि 11 ईस्ट बंगाल रेजिमेन्ट त्याचबरोबर 1, 2, 3 फील्ड रेजिमेन्ट आर्टिलरी ने या स्वातंत्र्य युद्धात भाग घेतला होता. याच युनिट्सचे सैन्य आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राजपथवरील पथसंचलनात भाग घेत आहेत.
Republic Day 2021 | ...म्हणून 26 जानेवारीलाच साजरा करतात 'प्रजासत्ताक दिन'!
भारत-बांग्लादेशच्या राजकीय संबंधाचे 50 वर्षे लेफ्टनंट कर्नल बनजीर अहमद यांच्या नेतृत्वाखालील मार्चिंग बॅन्डने "शोनो एकती मुजीबुर-अर थेके लोखो मुजीबुर" या गीताचे संगीत वाजवले आहे. लेफ्टनंट कर्नल बनजीर अहमद यांच्या मते, त्यांची ही तुकडी भारत- बांग्लादेशच्या मित्रत्वाची मशाल वाहक आहे. या वर्षी भारत आणि बांग्लादेशच्या राजकीय संबंधांना 50 वर्षे पूर्ण झाली आहेत, तसेच बांग्लादेशच्या स्वातंत्र्यालाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे बांग्लादेशच्या या तुकडीला विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे.