ATM मध्ये कॅश नसेल तर बँकांना भरावा लागणार 10 हजारांचा दंड; RBI चा नवीन नियम
RBI New Policy : आता दहा तासांहून अधिक काळ एटीएममध्ये पैसे नसतील तर बँकाना दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. आरबीआयचा हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात येणार आहे.
RBI New Policy : एटीएम मशिनमध्ये पैसे नसतील तर ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. आता यावर नियंत्रण येणार असून एटीएममध्ये जर पैसे नसतील तर संबंधित बँकेला दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी ही घोषणा केली असून हा नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
आरबीआयने यासंबंधी एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "अनेक एटीएममध्ये कॅशची कमी असल्याने मोठ्या कालावधीसाठी एटीएम मशिन बंद असतात. त्यामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं. यावर आरबीआयने अभ्यास केला असता असं लक्षात आलं आहे की एटीएममधील कॅश संपल्यावरही काही बँका त्यामध्ये पुन्हा कॅश भरत नाहीत, त्याला विलंब करतात. त्यामुळे आरबीआय आता नवीन नियम लागू करत असून त्यामुळे एटीएममध्ये पैसे नसल्यास बँकेला दहा हजार रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे."
आरबीआयने यासाठी 'Scheme of Penalty for non-replenishment of ATMs' या नियमाची घोषणा केली आहे. यानुसार एटीएममध्ये दहा तासाहून अधिक काळासाठी कॅश नसेल तर हा नियम लागू करण्यात येणार आहे.
आरबीआयने या नवीन नियमामागील कारणाही स्पष्ट केलं आहे. आरबीआयने सांगितलं आहे की, "सर्व बँकांनी आपल्या एटीएम सर्व्हिसला एक चांगल्या प्रकारे सुरु करावं. आपल्या एटीएममध्ये किती कॅश आहे याचं योग्य पद्धतीने नियोजन करावं आणि वेळ मिळताच पुन्हा या एटीएममध्ये पैसे टाकावेत. त्यामुळे ग्राहकांना मनस्तापाला सामोरं जावं लागणार नाही."
संबंधित बातम्या :