Rajya Sabha : राज्यसभेत भाजपची पहिल्यांदाच सेंच्युरी, 1988 नंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाचे राज्यसभा खासदार शंभरवर
Rajya Sabha Latest Update : जुलैपर्यंत जे 72 खासदार निवृत्त होतायत. त्यात महाराष्ट्रातल्या सहा खासदारांचा समावेश आहे. आता संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचं चित्र नेमकं कसं बदलणार आहे..
नवी दिल्ली : राज्यसभेचे (Rajya Sabha) तब्बल 72 सदस्य एप्रिल ते जुलै या तीन महिन्यांच्या काळात निवृत्त होत आहेत. लवकरच होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यसभेचं समीकरणही मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचं चित्र नेमकं कसं बदलणार आहे आणि महाराष्ट्रातून कुठल्या खासदारांची पुन्हा राज्यसभेवर नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
काल राज्यसभेत निरोपाची भाषणं तर झालीच. पण संध्याकाळी राज्यसभेच्या उपसभापतींनी खास मैफलीचंही आयोजन केलं होतं. कारणही तसंच आहे. कारण एकाचवेळी राज्यसभेचे 72 सदस्य पुढच्या तीन महिन्यांत निवृत्त होतायत.
कसं बदलणार आहे राज्यसभेचं गणित
- राज्यसभेत भाजपनं पहिल्यांदाच शतक गाठलं आहे
- भाजप खासदारांची संख्या 97 वर होती, नुकतीच 13 जागासांठी निवडणूक पार पडली, त्यात भाजपचे 3 खासदार निवडून आले आहेत.
- त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपनं राज्यसभेत तीन आकडी संख्या गाठली आहे
- 1988 नंतर पहिल्यांदाच कुठल्या पक्षाला राज्यसभेत 100 चा आकडा पार करता आला आहे
- दोन नंबरवर असलेल्या काँग्रेसची सदस्यसंख्या राज्यसभेत 33 आहे.
- नॉर्थ इस्टमधून सध्या काँग्रेसचा एकही खासदार राज्यसभेत नाहीय, स्वातंत्र्यानंतर प्रथमच ही वेळ पक्षावर ओढवली आहे.
- त्यात पुढच्या तीन महिन्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद आणखी वाढत जाईल
जुलैपर्यंत जे 72 खासदार निवृत्त होतायत. त्यात महाराष्ट्रातल्या सहा खासदारांचा समावेश आहे. काँग्रेसचे पी चिदंबरम, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे पीयुष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे, विकास महात्मे यांची राज्यसभेची टर्म 4 जुलैला संपत आहे.
साहजिकच महाराष्ट्रातल्या या 6 खासदारांपैकी पुन्हा राज्यसभेवर कोण निवडून येणार याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल असं दिसतंय. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यानं त्यांचंही पुन्हा येणं निश्चित आहे. महाराष्ट्रात भाजपचे तीन खासदार निवृत्त होतायत, पण महाविकास आघाडीची विधानसभेतली ताकद एकत्र राहिली तर भाजपचे दोनच खासदार पुन्हा निवडून येऊ शकतात. त्यामुळे विकास महात्मे यांच्या परतीचा मार्ग कठीण आहे.
याशिवाय राष्ट्रपती नामनिर्देशित महाराष्ट्रातले दोन खासदारांचीही टर्म संपत आहे. डॉ. नरेंद्र जाधव यांची टर्म 24 एप्रिलला तर संभाजीराजे छत्रपती यांची टर्म 3 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे राष्ट्रपती नामनिर्देशित कोट्यातून पुन्हा संधी कुणाला मिळणार, महाराष्ट्रातून त्यात कुणाचा समावेश असणार याचीही उत्सुकता आहे.
राष्ट्रीय पातळीवर पाहिलं तर गुलाम नबी आझाद यांच्या पाठोपाठ आता आनंद शर्मा यांचीही टर्म संपलीय. दोघेही जी 23 मधले नेते आहेत. गुलाम नबी यांना अद्याप पुन्हा संधी पक्षानं दिली नाहीय. आनंद शर्मा यांच्याही बाबतीत तेच होणार का हे पाहणं महत्वाचं असेल. शिवाय या वाढलेल्या ताकदीनंतर विधेयकं दोन्ही सभागृहात मंजूर करुन घेणं हे भाजपसाठी अगदी सोपं होत जाणार आहे. त्यामुळे कलम 370 नंतर संघाच्या वैचारिक अजेंड्यावरचे काही प्रलंबित विषय मोदी सरकार प्रत्यक्षात उतरवणार का? हे पाहावं लागेल.