Rain News : चेन्नईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, 14 जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर
तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. चेन्नईत (Chennai) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे.
Rain News : सध्या देशाच्या काही भागात जोराची थंडी (Cold Weather) सुरु आहे. तर दुसरीकडं दक्षिण भारतातील (South India) काही राज्यात पाऊस पडत आहे. हवामानात होत असलेल्या चढ उताराचा चांगलाच परिणाम दिसून येत आहे. तामिळनाडू (Tamil Nadu) राज्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. चेन्नईत (Chennai) रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. आजही हवामान विभागानं (Meteorology Department) तामिळनाडूसह पदुच्चेरीत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळं याठिकाणच्या 14 जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळं रस्ते पाण्याखाली, वाहतुकीवर परिणाम
चेन्नईच्या पुलियांथोप परिसरात मुसळधार पावसामुळं रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्यावर पाणी असल्यानं संथ गतीन वाहतूक सुरु आहे. त्यामुळं नागरिकांच्या दैनंदीन कामकाजात अडचणी येत आहेत. दरमयान, चेन्नई व्यतिरिक्त तिरुवल्लूर, कांचीपुरम, चेंगलपट्टू, रानीपेट, वेल्लोर, सेलम, नमक्कल, तिरुवन्नमलाई, कल्लाकुरिची आणि रामनाथपुरम जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं या जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
आजही तामिळनाडूत मुसळधार पावसाचा अंदाज
दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर काही डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीही होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागासह तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अशातच रात्री चेन्नईत मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आजही तमिळनाडू राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून अधिकाऱ्यांनी 5 हजार 93 मदत शिबिरे उभारली आहेत. तर केंद्र आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील 2 हजारहून अधिक मदत कर्मचारी तत्पर करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात गारठा वाढला
राज्याच्या अनेक भागात तापमानात घट झाली आहे. पहाटे जोराची थंडी वाजत आहे तर दुपारी उन्हाचा चटका वाढला आहे. कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. पहाटे काही ठिकाणी दव धुके पडत आहे. राज्याचे किमान तापमान 11 ते 22 अंशाच्या दरम्यान आहे, तर कमाल तापमान हे 31 ते 35 अंशाच्या आसपास आहे.
महत्त्वाच्या बातम्या: