Railway Ticket price: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, रिटर्न तिकीटावर मिळणार 20 टक्के सूट
गर्दी कमी करण्यासाठी, प्रवाशांना सोयीस्कर बुकिंग मिळावे आणि गाड्यांचा दोन्ही बाजूंनी कार्यक्षम वापर व्हावा यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

New Delhi : दिवाळी आणि छठ पर्वाच्या काळात रेल्वे प्रवाशांना मोठी दिलासादायक भेट मिळणार आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि दोन्ही बाजूच्या प्रवासातील तिकीट बुकिंग अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने ‘राउंड ट्रिप पॅकेज’ नावाची एक विशेष योजना आणली आहे. या योजनेत रिटर्न तिकीटाच्या बेस भाड्यावर तब्बल 20 टक्के सवलत मिळणार असून ही योजना 14 ऑगस्ट 2025 पासून प्रयोगात्मक स्वरूपात सुरू होणार आहे.(Discount on Return Ticket)
योजनेचे उद्दिष्ट
दिवाळी व छठ सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यावेळी विशिष्ट काही दिवसांतच तिकीटांसाठी प्रचंड गर्दी होत असते, तर काही दिवस गाड्या रिकाम्या जातात. गर्दी कमी करण्यासाठी, प्रवाशांना सोयीस्कर बुकिंग मिळावे आणि गाड्यांचा दोन्ही बाजूंनी कार्यक्षम वापर व्हावा यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कशी मिळणार सूट?
* प्रवाशांनी ये-जा (दोन्ही बाजू) प्रवासाचे तिकीट एकत्रच बुक करणे आवश्यक आहे. दोन्ही प्रवासात प्रवाशांची नावे, तपशील आणि वर्ग (क्लास) सारखाच असावा.
* पहिला प्रवास 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर 2025 दरम्यान सुरू होणाऱ्या गाड्यांमधील असावा.
* परतीचा प्रवास 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 या कालावधीत बुक करावा लागेल.
* परतीच्या तिकिटावरच 20 टक्के सवलत लागू होईल.
* ही सवलत सर्व वर्ग आणि बहुतेक गाड्यांमध्ये लागू असेल, मात्र ‘फ्लेक्सी फेअर’ असलेल्या गाड्यांसाठी ही योजना लागू होणार नाही.
महत्त्वाच्या अटी
1. दोन्ही तिकिटे कन्फर्म असणे आवश्यक.
2. एकाच गाडीने परतीचा प्रवास करणं बंधनकारक नाही, पण सुरुवातीच्या स्थानक व अंतिम स्थानक यांच्यातील प्रवास समान असावा.
3. तिकिट बुकिंगमध्ये बदल (मोडिफिकेशन) करण्याची परवानगी मिळणार नाही.
4. सवलतीच्या तिकिटासाठी रिफंड मिळणार नाही.
5. रेल्वे पास, पीटीओ, व्हाउचर किंवा इतर कोणत्याही कन्सेशनचा या योजनेत वापर करता येणार नाही.
6. दोन्ही तिकिटे एकाच माध्यमातून (ऑनलाइन किंवा आरक्षण काउंटरवर) बुक करावी लागतील.
प्रवाशांसाठी फायदेशीर
रेल्वेच्या मते, या योजनेमुळे गर्दीचे प्रमाण वेगवेगळ्या दिवसांवर विभागले जाईल आणि प्रवाशांना कमी त्रासात प्रवास करता येईल. विशेष गाड्यांसह नियमित गाड्यांमध्येही ही सुविधा उपलब्ध राहील. मात्र फ्लेक्सी फेअर असलेल्या राजधानी, शताब्दी, दूरंतो, वंदे भारत आणि तेजस यांसारख्या गाड्यांसाठी ही योजना लागू होणार नाही.
रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, ही योजना वापरून वेळेआधी प्रवासाचे नियोजन करावे, ज्यामुळे दिवाळी आणि छठ सणाच्या काळात सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल.























