राहुल गांधी 35 खासदारांसह हाथरससाठी रवाना; पीडित कुटुंबाला भेटणार
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी 35 खासदारांसह हाथरससाठी रवाना झाले आहेत.याआधी राहुल गांधी यांना पीडित कुटुंबाची भेट घेण्यापासून युपी पोलिसांनी रोखले होते.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी उत्तर प्रदेशातील हाथरसमधील पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी निघाले आहेत. राहुल गांधींसोबत काँग्रेस पक्षाचे 35 खासदारही हाथरसमधील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी निघाले आहेत. याआधीही राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न केला. ज्या दरम्यान त्यांना युपी पोलिसांनी धक्काबुक्की केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधीही होत्या.
आज अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) आणि पोलीस महासंचालक हाथरस मधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकणातील पीडितेच्या कुटुबियांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. हे दोन अधिकारी पीडित कुटुंबाला भेटतील आणि तेथून परत आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपला अहवाल सादर करतील.
पीडितेच्या कुटुंबाने हाथरसचे डीएम प्रवीण कुमार यांच्यावर अनेक आरोप लावले आहेत. डीएम प्रवीण कुमार यांनी संपूर्ण कुटुंबातील महिलांना धमकावले असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. पीडितेच्या भावाच्या म्हणण्यानुसार, डीएम प्रवीण कुमार यांनी घरातील महिलांशी गैरवर्तन केले.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यूपी सरकारने कडक कारवाई करत जिल्ह्यातील एसपीसह पाच पोलिसांना निलंबित केले. एसपी विक्रांत वीर सिंह, जिल्हा दंडाधिकारी (सीओ) राम शब्द, निरीक्षक दिनेश कुमार वर्मा, उपनिरीक्षक जगवीर सिंग आणि प्रमुख मोहरिर महेश पाल यांना निलंबित करण्यात आले आहे. आता शामलीचे एसपी विनीत जयस्वाल यांना हाथरसचे एसपी बनविण्यात आले आहे.
Hathras Case | राहुल आणि प्रियांका गांधी हाथरसला जाणार; यमुना एक्स्प्रेसवेवर पोलिसांचा मोठा फौजफाटा