Rahul Gandhi Ladakh Visit: राहुल गांधी लडाख दौऱ्यावर जाण्याची शक्यता, कारगिल हिल परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा
Rahul Gandhi Ladakh Visit : पुढील महिन्यात कारगिल हिल कांऊन्सिलच्या निवडणुका असताना राहुल गांधी यांचा हा लडाख दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
![Rahul Gandhi Ladakh Visit: राहुल गांधी लडाख दौऱ्यावर जाण्याची शक्यता, कारगिल हिल परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा Rahul Gandhi Ladakh Visit for two days from today detail marathi news Rahul Gandhi Ladakh Visit: राहुल गांधी लडाख दौऱ्यावर जाण्याची शक्यता, कारगिल हिल परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/09/f36cdffe30c2c1bd0c927eb33b94638a1691569915651599_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हे गुरुवार (17 ऑगस्ट) रोजी लडाखच्या (Ladakh) दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून एएनआयला देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे गुरुवार आणि शुक्रवार लडाखच्या दौऱ्यावर असणार आहेत. याआधी राहुल गांधी यांनी दोन वेळा जम्मू आणि काश्मीरचा दौरा केला आहे. परंतु त्या दौऱ्यावेळी त्यांनी लडाखला जाणं शक्य झालं नाही. सध्या लडाख दौऱ्यामध्ये त्यांच्या इतर कोणत्याही कार्यक्रमाचा खुलासा करण्यात आला नाही.
कारगिल हिल परिषदेच्या निवडणुका
पुढच्या महिन्यात कारगिल हिल कौन्सिल म्हणजेच लडाखच्या स्वायत्त हिल विकास परिषदेच्या निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. ही परिषद लडाखमधील कारगिल जिल्ह्याच्या प्रशासनाचे काम करते. त्यामुळे लडाखमध्ये या परिषदेच्या निवडणुकांना विशेष महत्त्व आहे. या निवडणुकांसाठी काँग्रेस आणि जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स यांनी युती केली आहे.
या वर्षात जानेवारी महिन्यात राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगरपर्यंत प्रवास केला होता. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी महिन्यात जम्मू आणि काश्मीरचा व्यक्तिगत दौरा देखील केला होता. परंतु त्यांना लडाखचा दौरा त्यावेळी काही तांत्रिक कारणास्तव करता आला नाही.
राहुल गांधी युरोप दौऱ्यावर जाणार
राहुल गांधी हे पुढील महिन्यात युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या वर्षातला त्यांचा हा तिसरा परदेश दौरा असणार आहे. याआधी त्यांनी दहा दिवसांचा अमेरिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी ते तीन देशांना भेट देणार आहेत. यामध्ये बेल्जियम, नॉर्वे आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. राहुल गांधी हे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये युरोपच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी राहुल गांधी हे युरोपियन युनियनच्या खासदारांना देखील संबोधित करणार आहेत.
या वर्षातला राहुल गांधी यांचा हा तिसरा परदेश दौरा असणार आहे. पण राहुल गांधी यांचा लंडन दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच राहुल गांधी यांचा लडाख दौरा देखील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरणार आहे. लडाख परिषदेच्या निवडणुका आणि आगामी लोकसभेच्या निवडणुका यामुळे राहुल गांधी यांच्या या दौऱ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. तसेच त्यांच्या लडाखच्या दौऱ्यावर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)