गरिबांच्या मदतीसाठी 65 हजार कोटींची गरज, राहुल गांधींसोबतच्या चर्चेत रघुराम राजन यांचं मत
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला. अर्थव्यवस्था, रोजगार, कोरोना संकटानंतर कशाप्रकारे सावरता येईल आणि सरकारला कोणती पावलं उचलावी लागतील या मुद्द्यांवर चर्चा झाली.
मुंबई : कोरोना व्हायरसमुळे मागील एक महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन आहे. देशातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. लोक घरातच आहेत. कारखान्यांना टाळं लागलेलं आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसत आहे. जीपीडीचा वेग पूर्णत: थांबला आहे. अर्थव्यवस्थेसमोरील या आव्हानांबाबत राहुल गांधी यांनी आज (30 एप्रिल) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली. "सध्याच्या घडीला गरिबांना मदत करणं आवश्यक आहे, ज्यासाठी सरकारला सुमारे 65 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील," असं रघुराम राजन म्हणाले.
कोरोना व्हायरसचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणामासंदर्भात काँग्रेसने नवी आजपासून (30 एप्रिल) नवी मोहीम सुरु केली. याअंतर्गत खासदार राहुल गांधी जगभरातील तज्ज्ञांशी चर्चा करणार आहेत, संवाद साधणार आहेत. राहुल गांधी या संवादाची सुरुवात रिझर्व बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांच्यापासून केली. अर्थव्यवस्था, रोजगार, कोरोना संकटानंतर कशाप्रकारे सावरता येईल आणि सरकारला कोणती पावलं उचलावी लागतील या मुद्द्यांवर चर्चा झाली.
डॉ. रघुराम राजन 2013 पासून 2016 पर्यंत रिझर्व बँकचे गव्हर्नर होते. अनेक वेळा त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकाही करताना दिसले.
गरिबांना 65 हजार कोटी रुपयांची मदत मिळणं आवश्यक : रघुराम राजन रघुराम राजन यांनी राहुल गांधी यांच्या एका प्रश्नावर उत्तर दिलं की, "देशातील गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत करावी लागेल, ज्यासाठी 65 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. गरिबांना 65 हजार कोटी रुपये देण्याची गरज आहे."
यूपी-तामिळनाडूसाठी एकच धोरण योग्य नाही : राहुल गांधी या चर्चेत राहुल गांधी म्हणाले की, भारतीय समाजव्यवस्था अमेरिकेच्या समाजापेक्षा अतिशय वेगळी आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बदल आवश्यक आहे. प्रत्येक राज्याची पद्धत वेगळी आहे. तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशाला एकाच दृष्टीकोनातून पाहू शकत नाही. आज ज्या प्रकारची असमानता आहे, तो अतिशय चिंतेचा विषय आहे. भारत आणि अमेरिकेत अशाप्रकारचं अंतर आहे. कारण ते संपवणं फार गरजेचं आहे.
लोकांसाठी नोकरीसाठी नव्या संधी निर्माण करायला हव्या : रघुराम राजन रघुराम राजन म्हणाले की, आपल्याकडे लोकांचं आयुष्य उत्तम करण्याचा उपाय आहे. अन्न, आरोग्य, शिक्षणावर अनेक राज्यांनी चांगलं काम केलं. पण सर्वात मोठं आव्हान हे मध्यमवर्ग आणि कनिष्ठ मध्यमवर्गासाठी आहे, ज्यांच्याकडे चांगल्या नोकऱ्या नाहीत. सध्याची घडीला लोकांना केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न ठेवता त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण करायला हव्यात.
अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे चालना द्यावी? आज लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेबाबत अतिशय चिंता आहे. अशा परिस्थितीत या आव्हानांना कसं सामोरं जायला हवं? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. यावर उत्तर देताना रघुराम राजन म्हणाले की, "कोरोनाला पराभूत करण्यासोबतच आपल्याला सामान्यांच्या रोजगाराबाबतही विचार करायला हवा. यासाठी कामाची ठिकाणं अधिक सुरक्षित करणं गरजेचं आहे."
कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. याबाबत राहुल गांधींनी विचारलं की अर्थव्यवस्थेला चालना कशी मिळेल? त्यावर रघुराम राजन म्हणाले की, "दुसरा लॉकडाऊन लावण्याचा अर्थ म्हणजे लॉकडाऊन उठवण्याबाबत सरकारला पूर्ण तयारी करता आलेली नाही. यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे की लॉकडाऊन 3 ही लागू होईल का? कोरोनाच्या रुग्णांची संख्या शून्यावर आली तरच लॉकडाऊन हटेल, असा विचार आपण केला तर ते अशक्य आहे."
कोरोना व्हायरसच्या टेस्टिंगबाबत प्रश्न देशात टेस्टिंगबाबत अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. इतर देशांच्या तुलनेत भारतात टेस्टिंगचं प्रमाण अतिशय कमी होत आहे, असं राहुल गांधी यांनी सांगितलं. यावर रघुराम राजन म्हणाले की, "जर आपल्याला अर्थव्यवस्थेला चालना द्यायची असेल तर टेस्टिंगची क्षमता वाढवायला हवी. आपल्याला मास टेस्टिंगच्या दिशेने वाटचाल करावी लागणार आहे. ज्यात कोणतेही 1000 नमुने घेऊन चाचणी करावी लागेल. अमेरिकेत आज लाखों चाचण्या दररोज होतात, पण आपण 20 किंवा 30 हजार चाचण्याच करत आहोत."
कोरोना संकटात भारताला फायदा होईल? अशाप्रकारच्या परिस्थितीत भारताला फायदा होऊ शकतो का? कोरोना व्हायरसचं संकट संपल्यावर भारताला काय करायला हवं? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. त्यावर रघुराम राजन म्हणाले की, "अशा प्रकारच्या घटना फारच कमी वेळा कोणासाठी तरी फायदेशीर ठरतात. पण भारतासाठी ही संधी आहे की, आपले उद्योग जगभरात पोहोचावेत आणि लोकांशी संवाद साधावा."
अर्थव्यवस्थेबाबत निर्माण होणाऱ्या आव्हानांबाबत रघुराम राजन यांनी सांगितलं की, "आपल्याला लवकरात लवकर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण आपल्याकडे इतर देशांप्रमाणे चांगली व्यवस्था नाही. जे आकडे आहेत ते चिंता वाढवणारे आहेत. 10 कोटी लोकांना नोकरी गमवावी लागू शकते, आपल्याला हालचाल करावी लागणार, असं सीएमआयईनेही म्हटलं आहे.