(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Punjab Election : पंजाबमध्ये आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? आज अधिकृत घोषणा
Punjab Assembly Election 2022 : आम आदमी पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? यासंदर्भात आज अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
Punjab Assembly Election 2022 : आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सर्व पक्षांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीही सज्ज झाली असून निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे. आतापर्यंत आपकडून उमेदवारांच्या 10 याद्या जारी करण्यात आल्या आहेत. परंतु, अद्याप पंजाबमध्ये पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, मंगळवारी पंजाब निवडणुकीतील मुख्यमंत्री पदासाठी आपकडून दावेदार असणाऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येईल.
सोमवारी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, पंजाबचे सह-प्रभारी राघव चड्ढा यांनी माहिती दिली की, आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल मंगळवारी पंजाबसाठी पक्षाकडून मुख्यमंत्रिपदासाठी दावेदार असणाऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा करतील. राघव चढ्ढा म्हणाले की, मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबद्दलच्या सर्व शंका दूर होतील. मंगळवारी अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये येत असून सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ते मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील.
राघव चढ्ढा यांनी दावा केला की, मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडण्यासाठी पक्षानं जाहीर केलेल्या क्रमांकावर लोकांकडून मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून हे सिद्ध झालं आहे की, आम आदमी पक्षाचा घोषित मुख्यमंत्री चेहरा पंजाबचा पुढील मुख्यमंत्री असेल. पंजाबमधील जनतेला आता बदल हवा आहे आणि पंजाबमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आम आदमी पक्षाला बहुमत देण्याचा निर्धार पंजाबच्या जनतेनं केला आहे.
पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून मुख्यमंत्री पदासाठी दावेदार असणारा एकच चेहरा चर्चेत होता आणि तो चेहरा भगवंत मान यांचा होता. भगवंत मान यांना आपकडून मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं जाऊ शकतं, अशी माहिती मिळत आहे. परंतु अरविंद केजरीवाल यांनी मोहालीमध्ये एक नंबर जारी केला होता. या नंबरवर जनतेनं त्यांना हव्या असलेल्या मुख्यमंत्र्यांचं नाव सांगण्याचं आवाहन केजरीवाल यांनी केलं होतं.
आम आदमी पक्षानं या मोहिमेला 'जनता चुनेगी अपना सीएम' असं नाव दिलं आहे. या क्रमांकावर मेसेज करून 17 जानेवारीला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सूचना करायच्या होत्या. जनतेच्या उत्तरांच्या आधारेच आम आदमी पक्ष आपल्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा जाहीर करेल, असं सांगण्यात आलं होतं. यावर केजरीवाल म्हणाले होते की, 1947 नंतर पहिल्यांदाच असं घडत आहे की, कोणताही पक्ष मुख्यमंत्री कोणाला निवडायचा, असं जनतेला विचारत आहे.
दरम्यान, सोमवारी पोस्टर जारी करताना आम आदमी पक्षानं म्हटले आहे की, देशाच्या पाच समस्यांवर एकच उपाय आहे, तो म्हणजे अरविंद केजरीवाल. आणि त्या पाच समस्या म्हणजे, भ्रष्टाचार, गरीब सरकारी शाळा, दुरावस्थेत असलेली सरकारी रुग्णालयं, वाढती वीज आणि पाण्याची बिलं, बेरोजगारी.
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली
पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. 16 फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती असल्याने 14 फेब्रुवारी रोजी होणारी निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार आहे. संत रविदास यांची जयंती असल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे आज निवडणूक आयोगाची बैठक झाली. या बैठकीत निवडणूक 14 ऐवजी 20 फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
पंजाब विधानसभेसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेततला होता. परंतु, रविदास यांची जयंती असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी केली होती. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबत विचार करण्यासाठी आज बैठक बोलवली होती. या बैठकीत सर्व राजकीय पक्षांची बाजू विचारात घेत निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मतदानाची तारीख पुढे ढकलली असली तरी 10 मार्च रोजी ठरल्यानुसार मतमोजणी होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Punjab Election 2022: पंजाब विधानसभेची निवडणूक पुढे ढकलली, 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला होणार मतदान
- Election 2022 : तुमच्या मनातून जात कधी जाणार?, संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
- UP Election: नरेश टिकैत यांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही; राकेश टिकैत यांचे स्पष्टीकरण
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह