President Election : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावात अद्याप वीज नाही, मोबाईल चार्जसाठी जावे लागते दीड किलोमीटर दूर
President Election : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu) यांच्या मूळ गावी आजपर्यंत वीज पोहोचली नसल्याची माहिती समोर आली आहे. आजही गावातील लोक रॉकेलच्या मदतीने आग लावून घरातील अंधार नाहीसा करतात.
President Election : राष्ट्रपती निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu) सध्या प्रचारात व्यस्त आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत द्रौपदी मुर्मू सध्या खूप चर्चेत आहेत. मात्र याच दरम्यान त्यांच्या मूळ गावी आजपर्यंत वीज पोहोचली नसल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांना सरकारवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म ओडिशातील मयूरगंज जिल्ह्यातील उपरबेडा गावात झाला आहे. स्वातंत्र्य मिळून आज इतकी वर्षे झाली आहेत. परंतु, अद्याप त्यांच्या मूळ गावी वीज पोहोचलेली नाही. आजही त्यांचे मूळ गाव विजेच्या सुविधेपासून दूर आहे.
द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावाची लोकसंख्या 3500 च्या आसपास आहे. या गावात बाराशाही आणि डुंगरीशाही ही दोन भाग आहेत. यातील बाराशाहीत वीज उपलब्ध आहे, मात्र स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही डुंगरीशाहीत वीज पोहोचलेली नाही. वीज नसल्यामुळे आजही डुंगरीशाहीतील लोक घरांमध्ये प्रकाश आणण्यासाठी रॉकेलच्या दिव्यावर अवलंबून आहेत. आजही गावातील लोक रॉकेलच्या मदतीने आग लावून घरातील अंधार नाहीसा करतात. त्याचबरोबर विजेअभावी गावातील लोकांना मोबाईल चार्ज करण्यासाठी गावापासून एक किलोमीटर दूर जावे लागते.
उमेदवारी दिल्यानंतर वीज पोहोचवण्यासाठी प्रयत्न
द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यापासून डुंगरीशाहीही गाव चर्चेत आले आहे. मुर्मू यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गावात वीज पोहोचवण्यासाठी ओडिशा सरकारने युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
द्रौपदी मुर्मू यांच्या गावात अद्याप वीज नाही हा मुद्दा पकडत विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या मुद्यावरून काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधलाय. "ज्या दिवशी पंतप्रधान मोदींनी दावा केला होता की सर्व गावांमध्ये वीज पोहोचली आहे त्यावेळी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या मूळ गावात वीज नसल्याचे आम्ही पाहिले. प्रसारमाध्यमांमध्ये याबबतचे वृत्त आहे, त्यानंतर आता तेथे वीज देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू यांच्याच गावात फक्त वीज नाही असे नाही तर देशातील अनेक दुर्गम भागात अजूनही वीज पोहोचलेली नाही, असे ट्विट पी. चिदंबरम यांनी केले आहे.