Prashant Kishor Political Party: आता जनतेमध्ये जाण्याची वेळ, प्रशांत किशोर काढणार नवीन राजकीय पक्ष?
निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांनी स्वत: चा पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत.
Prashant Kishor Political Party : सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी त्यांनी योजना दिली आहे. त्यानंतर प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा देखील सुरु होत्या. मात्र, आता प्रशांत किशोर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु आहे. प्रशांत किशोर यांनी स्वत: चा पक्ष काढण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक ट्वीट केले आहे, त्या ट्वीटमध्ये त्यांनी जनतेमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं
प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट केले आहे. त्या ट्वीटची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. त्या ट्विटमध्ये प्रशांत किशोर यांनी आता जनतेसमोर जाण्याची वेळ आली आहे. त्याची सुरुवात बिहारपासून होईल असे म्हटले आहे. मात्र, त्यांनी पक्ष कधी काढणार, त्यांच्या पक्षाचे नाव काय असेल, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र, सुरुवात बिहारमधून करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बिहारमधूनच नवीन 'जन सूरज' मोहीम सुरु करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. लोकशाहीत प्रभावी योगदान देण्याची त्यांची भूक आणि लोकांप्रती कृती धोरणे तयार करण्याचा त्यांचा प्रवास खूप चढ-उताराचा राहिला आहे. आज जेव्हा ती पाने उलटतात, तेव्हा आता जनतेमध्ये जाण्याची वेळ आली आहे. जेणेकरुन लोकांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत होईल असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
लवकरच साधणार तरुणांशी संवाद
सध्या प्रशांत किशोर यांची टीम बिहारच्या प्रत्येक जिल्ह्यात नवीन टीम तयार करत आहे. प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन केले जात आहे. काही दिवसात प्रशांत किशोर बिहारमधील तरुणांशी संवाद साधणार असल्याची माहिती देखील सुत्रांनी दिली आहे.
लवकरच करणार राजकीय पक्षाची घोषणा
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत किशोर येत्या काही दिवसातच बिहारमधील सुशासनाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून अभियान राबवणार आहेत. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच ते राजकीय पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर राजकारणात आल्यास दुसऱ्या पक्षांसाठी त्यांनी जे रणनिती आखली होती. त्यामाध्यमातून इतर पक्षांना त्यांचा फायदाही झाला होता. तसाच फायदा त्यांनी काढलेल्या पक्षाला होणार का हे पाहाणं महत्त्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा
प्रशांत किशोर यांनी गेल्या महिन्यात अनेकवेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची योजनाही त्यांनी सांगितली होती. ते स्वत: काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा देखील सुरु होती. मात्र, काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने त्यांनी पक्षात येण्यास नकार दिला होता.