Power Crisis In India: देशातील 'या' तीन राज्यात विजेच्या टंचाईची शक्यता, केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी घेतली बैठक
देशातील काही राज्यावर विजेचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. कोळशाची आयात महागल्याने तीन राज्यांमध्ये विजेची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते.
Power Crisis In India : सध्या देशात तापमानात मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाढल्याने लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशातच देशातील काही राज्यावर विजेचे संकट पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. कोळशाची आयात महागल्याने तीन राज्यांमध्ये विजेची तीव्र टंचाई निर्माण होऊ शकते. येत्या काही दिवसांत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्थानमध्ये विजेअभावी सर्वसामान्यांना मोठा त्रास होण्याची शकता व्यक्त केली जात आहे. विजेच्या संकटाबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे.
दरम्यान, सध्या तीन राज्यांत वीजटंचाई असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. याबाबत कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, देशाचे कोळसा उत्पादन गेले आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 8.5 टक्क्यांनी वाढून 77.72 दशलक्ष टनांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. कोळशाच्या टंचाईच्या बातम्या पाहता त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीमुळे कोळसा टंचाईचे संकट निर्माण झाल्याचे वृत्तात म्हटले आहे. जोशी यांनी एका निवेदनात म्हटले की, देशातील कोळसा क्षेत्राने गेल्या आर्थिक वर्षात 77.72 दशलक्ष टनांचे विक्रमी उत्पादन केले. मागील आर्थिक वर्षात कोळशाचे उत्पादन 71.6 दशलक्ष टन होते.
पंजाबमध्ये कोळशाचा तुटवडा
दरम्यान, पंजाबमधील लोकांना 300 युनिट मोफत विजेची पहिली हमी देण्यासाठी आप सरकार तयार आहे. पंजाबमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळं राज्यात वीजपुरवठा खंडित झाला आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आधीच आर्थिक ताणतणावाखाली आहे. त्यामुळे पंजाब सरकारला विजेच्या पुरवठ्याबाबत विचार करावा लागेल. कारण यावेळी पंजाबमधील विजेची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याची माहिती मिळत आहे.
विजेच्या संकटाबाबत केंद्रीय ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली आहे. घाबरण्याची गरज नाही, आम्ही विजेची मागणी पूर्ण करु, असे यावेळी ऊर्जामंत्री आरके सिंह यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रातही भारनियन सुरु करण्यात आले आहे. विजेची टंचाई निर्माण झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाने वीज खरेदी करायला मान्यता दिली आहे. केंद्रांच्या दरापेक्षा कमी दरात मिळणार आहे.
महाराष्ट्रात उष्णतेची मोठी लाट आली आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्याची वीज मागणी सध्या 29,000 मेगावॅटच्या घरात गेली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: