भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी, ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांचं भाकित
भारतातील कोरोना आता कमकुवत झाल्याचं मत जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केलंय. डॉ. जॉन जेकब यांनीही संशोधनातून डॉ. स्वामिनाथन यांच्या मताला दुजोरा दिला.
मुंबई : भारतात आताच्या स्थितीत कोरोनाव्हायरसची तिसरी लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे. सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे तर नक्कीच नाही. असं भाकित ज्येष्ठ जीवाणूतज्ज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांनी केलं आहे. ते आयसीएमआरच्या सेंटर फॉर अॅडव्हान्सड् रिसर्च इन व्हायरॉलॉजीचे माजी प्रमुख आहेत.
प्रसिद्ध जीवाणूतज्ञ डॉ. टी जॉन जेकब यांच्या भाकितामागे असलेला विश्वास हा सीएसआयआरच्या संशोधनातून सिद्ध झालेला आहे. डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाव्हायरसच्या महासाथीची तिसरी लाट येईल का यावर सीएसआयआरने अभ्यास केला आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष लवकरच जाहीर होणार आहेत.
जवळपास अशाच प्रकारचा विश्वास जागतिक आरोग्य संस्थेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही व्यक्त केलाय. भारतातील कोरोनाव्हायरस आता कमकुवत झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय, तसंच भारतीय आता कोरोनासोबत जगायला शिकले असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्याकडून मिळालेला हा दिलासा खूपच महत्वाचा आहे. आयसीएमआरच्या प्रगत विषाणूविज्ञान संशोधन केंद्राचे माजी डॉ. जॉन जेकब यांनीही आपल्या संशोधनातून डॉ. स्वामिनाथन यांच्याच मताला दुजोरा दिला आहे.
आयसीएमआरच्या अभ्यासानुसार, दिल्लीतील त्यांच्या कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या तब्बल 86 टक्के कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत. जवळपास असंच प्रमाण लखनौ आणि दिल्लीजवळच्या गाझियाबादमधील कुटुंबांमध्येही आढळून आलं आहे. आयसीएमआरचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये करण्यात आलेल्या या सर्वेक्षणाचे प्रमुख डॉ. अनुराग अग्रवाल सांगतात, "कोरोना प्रतिबंधक अँटीबॉडीज फक्त दिल्लीतील कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांमध्ये आढळल्यात असं नाही. देशभरातील अनेक कुटुंबांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात हे प्रमाण लक्षणीय आहे. या सर्वेक्षणात फक्त दिल्लीतील आयसीएमआरच्या कोणतीही लस न घेतलेल्या 850 कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता."
अनेक साथरोग तसंच जीवाणूतज्ञांच्या मते देशातील 86 टक्के नागरिकांमध्ये असलेलं अँटीबॉडीजचं प्रमाण हर्ड इम्युनिटी किंवा सामुहिक प्रतिकारक्षमता तयार होण्यासाठी पुरेसं आहे. अगदी डेल्टा व्हेरिअंटसारख्या वेगाने पसरणाऱ्या विषाणूला थोपवण्यासाठी हे प्रमाण उपयुक्त आहे.
मात्र याचा अर्थ कोरोनाविरुद्धची लढाई आपण जिंकलीय असा काढू नये असा इशाराही हे शास्त्रज्ञ देत आहेत.डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरियंटपेक्षाही अधिक भीषण व्हेरियंट भविष्यात तयार होण्याचा धोका कायमच आहे.
व्हायरॉलॉजिस्ट शाहीद जमील यांच्या मते, हर्ड इम्युनिटीविषयी यापूर्वी मांडण्यात आलेले ठोकताळे डेल्टा व्हेरियंटमुळे मोडीत निघाले. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या वेगाला थोपवण्यासाठी सक्षम रोगप्रतिकारशक्ती आपल्यात असली तर आपल्याला त्याचा त्रास होणार नाही, हे अतिशय सोपं, तर्कसंगत आणि शास्त्रीय आहे. डॉ. शाहीद जमील हे अशोका युनिव्हर्सिटीच्या त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सेसचे संचालक आहेत.
गेल्या वर्षी, कोविड 19 ची महासाथ सुरु झाली तेव्हा अनेक तज्ञांना असं वाटत होतं की 65 ते 70 टक्के लोकांमध्ये कोविड प्रतिबंधक अँटीबॉडीज तयार झाल्या की हर्ड इम्युनिटी तयार होईल, मात्र हे ठोकताळे प्रत्यक्षात आले नाहीत कारण वेगाने पसरणाऱ्या वेगवेगळे कोरोना व्हेरियंट तयार झाले.
मे ते जुलै दरम्यान घेण्यात आलेल्या आयसीएमआरच्या देशव्यापी चौथ्या सिरो सर्वेक्षणात 67 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज असल्याचं आढळून आलं. मात्र हे प्रमाण सगळीकडे सारखं नव्हतं. म्हणजे बिहारमध्ये 79 टक्के सिरोपॉझिटिव्हिटी आढळून आली तर केरळमध्ये फक्त 44 टक्के. त्यानंतरही मोठ्या संख्येने अनेकांना लागण होत होती. कोरोनाबाधितांचे आकडे वाढत होते. त्यामुळे अर्थातच लागण होऊन बरे झालेल्यांमध्ये कोरोना अँटीबॉडीज वाढल्या असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आणखी एक सर्वेक्षण घेतलं जाणार आहे.
या सिरो सर्वेक्षणात जर 75 टक्के भारतीयांमध्ये कोरोना अँटीबॉडीज आढळून आल्या तर त्यामुळे काय भाकित वर्तवता येईल. ज्येष्ठ विषाणूतज्ञ डॉ. टी जेकब जॉन यांच्या मते कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटमुळे, जो आतापर्यंत सर्वाधिक प्रसार करणारा समजला गेला आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही हे स्पष्टच आहे. कारण डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव भारतापुरता तरी बराच कमी झाला आहे.
मात्र सध्या असलेल्या कोरोना विषाणूंच्या नव्या म्युटेशनमुळे आणखी घातक विषाणू अवतार तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्सचे प्राध्यापक डॉ. पार्थ मजूमदार यांना वाटतं. भविष्यातील कोरोना विषाणूंचे म्युटेट झालेले अवतार किती भयावह आणि वेगाने पसरणारे असतील याविषयी फक्त अंदाज बांधता येऊ शकतात, प्रत्यक्षात ते किती विध्वंसक असतील हे आताच सांगता येणार नाही, असं टीएफआयआरच्या स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्सचे डीन डॉ. संदीप जुनेजा सांगतात.