गरीब कुटुंबांसाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'ची घोषणा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिहेरी तलाक, देशाची आर्थिक प्रगती, महिला सुरक्षेची माहिती देत, सरकारच्या चार वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखाही देशाली दिला.

नवी दिल्ली : भारताच्या 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्लावरून पाचव्यांदा देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी तिहेरी तलाक, देशातील गरिबी, देशाची आर्थिक प्रगती, महिला सुरक्षा यासारख्या विविध विषयांना हात घातला. तसेच सरकारच्या चार वर्षाच्या कामकाजाचा लेखाजोखाही सांगितला. स्वातंत्र्य दिनाला मोदींनी देशातील गरीब जनतेसाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा केली.
प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची घोषणा देशातील गरिबात गरीब व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळावी यासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजना' सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत देशातील 10 कोटी कुटुंबाला दरवर्षी 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. पंडित दीनदयाल यांच्या जयंतीनिमित्त 25 सप्टेंबरपासून प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेची सुरूवात केली जाणार आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमुळे यापुढे देशातील कोणतंही गरीब कुटुंब उद्ध्वस्त होणार नसल्याचंही मोदी यांनी म्हटलं.
मुस्लीम महिलांना न्याय मिळवून देणारच तिहेरी तलाकसारख्या गंभीर आणि मुस्लीम महिलांच्या हिताच्या विषयावरही मोदींना भाष्य केलं. तिहेरी तलाकमुळे अनेक महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, आम्ही कायदा करतोय, पण त्याला काहीजण विरोध करत आहेत. मात्र मुस्लिम महिलांना आश्वस्त करत आहोत की आम्ही तो कायदा करणारच असल्याचं ठोस आश्वासन मोदींनी दिलं.
देशातील वाढत्या बलात्कारांच्या घटना गंभीर असून बलात्काराची राक्षसी वृत्ती देशातून हद्दपार करायला हवी. बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा दिल्याने राक्षसी मनोवृत्ती कमी होईल. त्यामुळे बलात्काऱ्यांमध्ये भीती निर्माण होईल, असं मोदी म्हणाले.
स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचे जीव वाचले स्वच्छता अभियानाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आल्याची माहिती यावेळी मोदींनी देशाला दिली. WHOच्या अहवालानुसार, भारतात स्वच्छता अभियानामुळे तीन लाख मुलांचे प्राण वाचल्याचं मोदींनी सांगितलं. मात्र स्वच्छता अभियानाची अनेकांनी खिल्ली उडवल्याची आठवणही मोदींनी यावेळी करुन दिली.
देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांचं मोठं योगदान देशातील प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या वैज्ञानिकांचा गौरव मोदींनी लाल किल्ल्यावरून केला. एकाच वेळी अंतराळात 100 उपग्रह सोडून वैज्ञानिकांनी विक्रमी कामगिरी केली. 2022 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बनावटीच्या यानातून पहिला भारतीय अंतराळाची सफर करू शकेल. मानवाला अंतराळात पाठवणारा भारत चौथा देश ठरेल. देशाच्या प्रगतीत वैज्ञानिकांचा वाटा मोठा आहे, असंही मोदींनी सांगितलं.
कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ देशातील कर भरणाऱ्यांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाल्याची माहिती यावेळी मोदींनी दिली. 2013 पर्यंत टॅक्स भरणाऱ्यांची संख्या 4 कोटी होती, आता टॅक्स भरणाऱ्यांची संख्या पावणे सात कोटी आहे. प्रामाणिक करदात्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. या करदात्यांमुळेच देशासाठी, गरिबांसाठी अनेक योजना राबवणं शक्य होतं. देशातील करदात्यांमुळे लाखो कुटुंबाचं पोट भरतं, असंही मोदीं म्हणाले.
सरकारच्या कामगिरीचा मोदींकडून लेखाजोखा - एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार देशातले पाच कोटी लोक गेल्या दोन वर्षांत गरिबीरेषेतून वर आलेत - 13 कोटी मुद्रा कर्ज, त्यापैकी 4 कोटी लोकांनी पहिल्यांदाच कर्ज घेतलं. - शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. - ज्या शहरांची कधीही चर्चा नव्हती ती शहरं आज प्रगतीपथावर आहेत. - छोटी गावं, शहरांमध्ये स्टार्टअपला सुरूवात झाली आहे. - जगभरातील अर्थतज्ज्ञांकड़ून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक होतं आहे. - देशातील बंद पडलेल्या सिंचन प्रकल्पांची कामं सुरू केली. - 2013 च्या वेगानं देशात सर्वत्र शौचालयं पोहोचवायला एक शतक लागलं असतं, सर्व गावात वीज पोहचवायला आणखी दोन दशके लागली असती - खादीची विक्री आज दुप्पट झाली आहे, त्यामुळे गरिबाच्या हातात पैसा मिळाला
पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
