PM Modi Departed For India: तीन दिवसांचा युरोप दौरा संपवून पंतप्रधान मोदी मायदेशी रवाना, तीन दिवसात विविध मुद्यांवर केली चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याचा समारोप करुन मायदेशी रवाना झाले आहेत. या तीन दिवसात त्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली आहे.
PM Modi Departed For India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा युरोप दौरा पूर्ण झाला आहे. तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याचा समारोप करुन पंतप्रधान मोदी हे मायदेशी रवाना झाले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली. यामध्ये त्यांनी संरक्षण, अंतराळ, नागरी आण्विक सहकार्य तसेच द्विपक्षीय संबंध या मुद्द्यांवर चर्चा केली. रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याची मला संधी मिळाली. त्यांनी केलेलं स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे आणि फ्रान्स सरकारचे आभार मानतो असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्सच्या नेतृत्वासोबत अनेक उच्चस्तरीय बैठका घेतल्या. तसेच तिन्ही देशातील भारतीयांशी संवाद देखील साधला. आपल्या दौऱ्यात पंतप्रधानांनी जर्मनी आणि डेन्मार्कमधील व्यावसायिकांशी संवाद साधला.
बर्लिनमध्ये काय घडले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी बर्लिनमधील 6 व्या भारत-जर्मनी चर्चेत भाग घेतला. त्यापूर्वी मोदींनी जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. भारत आणि जर्मनीमध्ये एकूण 9 करार झाले आहेत. ग्रीन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट पार्टनरशिप (JDI) या घोषणेचा यामध्ये समावेश आहे. या अंतर्गत जर्मनीने 2030 पर्यंत भारताला 10 अब्ज युरो नवीन आणि अतिरिक्त विकासात्मक सहाय्य देण्याचे मान्य केले आहे.
दरम्यान, दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान कोपनहेगनमध्ये पोहोचले, त्यांनी तिथे त्यांचे डॅनिश समकक्ष मेटे फ्रेड्रिक्सन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यावरणीय कृतीवरील सहकार्यासह द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. स्थलांतर, गतिशीलता, कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि उद्योजकता आणि ऊर्जा धोरणाचा शुभारंभ या क्षेत्रातील सहकार्यावरील सामंजस्य करार यासह अनेक करारांवर दोन्ही देशांदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली आहे.
भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत काय घडले?
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, पंतप्रधान मोदींनी नॉर्वे, स्वीडन, आइसलँड, फिनलंड आणि डेन्मार्कच्या पंतप्रधानांसह चर्चा केली. तसेच दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेला हजेरी लावली. शिखर परिषदेदरम्यान, पंतप्रधानांनी नॉर्डिक देश आणि भारत यांच्यातील सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. युक्रेनमधील संघर्ष, बहुपक्षीय सहकार्य आणि हवामान बदलासह आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची चर्चा केली. अर्थव्यवस्था, डिजिटलायझेशनच्या मुद्द्यावरही पंतप्रधानांनी चर्चा केली.
महत्त्वाच्या बातम्या: