'मन की बात'मधून पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या छठ पुजेच्या शुभेच्छा; 'या' गोष्टींचाही केला उल्लेख
PM Narendra Modi Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमात छठ पूजेच्या शुभेच्छा दिल्या आणि सौरऊर्जेमुळे देशवासीयांना होणारे फायदे सांगितले.
PM Narendra Modi Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी (30 ऑक्टोबर) पुन्हा एकदा 'मन की बात' (Mann ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. छठ पूजेच्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमाला शुभेच्छा संदेश देऊन सुरुवात केली. त्यांनी छठपूजा आणि सूर्यपूजेचे महत्त्वही मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये बोलताना म्हणाले की, "आज देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा सर्वात मोठा सण छठ पूजा साजरा केला जातो. आपल्या कुटुंबीयांसोबत अनेकजण मोठ्या उत्साहात छठ उत्सव साजरा करतात. मी प्रार्थना करतो की, छठ देवी सर्वांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद देईल. आपली संस्कृती, आपली श्रद्धा निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे, याचा पुरावा म्हणजे, सूर्यपूजेची परंपरा. या पूजेच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाचे महत्त्व सांगितलं जातं. त्याचप्रमाणे, चढ-उतार हा जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचा संदेशही या पूजेच्या माध्यमातून दिला जातो.
'गुजरातमध्येही छठपूजेला सुरुवात'
पंतप्रधान पुढे म्हणाले की, "छठ पूजेचा सण देखील 'एक भारत-श्रेष्ठ भारत'चं उदाहरण आहे. आज बिहार आणि पूर्वांचलचे लोक देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असले, तरी छठ पूजा मोठ्या थाटामाटात साजरी करतात. दिल्ली, मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आणि गुजरातच्या अनेक भागांतही छठ पूजेचं आयोजन मोठ्या प्रमाणावर केलं जात आहे. पूर्वी गुजरातमध्ये छठपूजेची फारशी व्यवस्था नव्हती, पण कालांतरानं जवळपास संपूर्ण गुजरातमध्ये छठपूजेचे रंग दिसू लागले आहेत. हे पाहून मलाही खूप आनंद झाला. आजकाल आपण पाहतो की, परदेशातूनही छठपूजेची किती भव्य फोटो येतात. म्हणजेच, भारताचा समृद्ध वारसा, आपली श्रद्धा, जगाच्या कानाकोपऱ्यात आपली ओळख वाढवत आहे. या महान उत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला माझ्या हार्दिक शुभेच्छा."
सौरऊर्जेबाबत पंतप्रधान मोदी म्हणतात...
"सध्या आपण पवित्र छठ पूजेबद्दल, भगवान सूर्याच्या उपासनेबद्दल बोललो आहोत, तर आज सूर्योपासना बरोबरच, आपण त्याच्या वरदानाची देखील चर्चा केली पाहिजे. सूर्यदेवाचे वरदान आहे, 'सौर ऊर्जा'. हा एक असा विषय आहे, ज्यामध्ये संपूर्ण जग आपल्या भविष्याकडे पाहत आहे आणि भारतासाठी, सूर्यदेवाची केवळ शतकानुशतके पूजा केली जात नाही, तर सूर्यदेव जीवनपद्धतीच्या केंद्रस्थानी आहेत.", असं मोदी म्हणाले.
"भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांना आधुनिक विज्ञानाशी जोडत आहे. त्यामुळेच आज आपण सौरऊर्जेपासून वीज निर्मिती करणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक बनलो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचे जीवन कसे बदलत आहे, हाही अभ्यासाचा विषय आहे. तामिळनाडूमध्ये, कांचीपुरममध्ये एक शेतकरी आहे, थिरू के अजिलन. त्यानं पीएम कुसुम योजनेचा लाभ घेतला आणि त्याच्या शेतात दहा हॉर्स पावरचा सौर पंपसेट बसवला. आता त्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारी उपकरणं वापरताना विजेवर काहीही खर्च करावा लागणार नाही. आता ते शेतात सिंचनासाठी सरकारच्या वीज पुरवठ्यावरही अवलंबून नाहीत.", असंही मोदी म्हणाले.
"त्याचप्रमाणे, कमलजी मीना हे राजस्थानमधील भरतपूर येथील पीएम कुसुम योजनेचे आणखी एक लाभार्थी शेतकरी आहेत. कमलजींनी शेतात सोलर पंप बसवला. त्यामुळे त्यांचा खर्च कमी झाला. खर्च कमी झाला तर उत्पन्नही वाढलं. कमलजी सोलरशी इतर अनेक लघुउद्योगांनाही जोडत आहे. त्यांच्या परिसरात लाकूडकाम, शेणापासून बनवलेली उत्पादनं करणारे लघुउद्योग आहेत. त्यात सौरऊर्जेचाही वापर केला जात आहे.", असंही मोदी म्हणाले.