Mann Ki Baat : जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात, ही अभिमानाची बाब : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदींची ही या वर्षातली तिसरी आणि एकूण 75 वी मन की बात होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आपल्या सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज भारतात, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम चालविला जात आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण देशासाठी आदर्श उदाहरण ठरला. शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल, असं ते म्हणाले. कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे, हे सगळं करोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. मागील वर्षी आपल्यासमोर प्रश्न होता की, कोरोना लस कधी येणार? आता आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबत आहे, असं मोदी म्हणाले.
‘दवाई भी कडाई भी’ प्रत्यक्ष आचरणात आणायचे
पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी अतोनात कष्ट सहन केले. देशासाठी बलिदान देणे हे आपले कर्तव्य आहे असे ते मानत असत. त्यांच्या त्याग आणि बलिदानाच्या अमर कहाण्या आपल्याला आता सदैव कर्तव्याच्या मार्गाने जाण्यासाठी प्रेरित करत राहोत, असं ते म्हणाले. कोरोनाच्या या सर्व परिस्थिती दरम्यान, #COVID19 शी लढा देण्याचा मंत्र पण नक्की लक्षात ठेवा.'दवाई भी - कडाई भी' ! आणि आपल्याला फक्त बोलायचेच आहे असे नाही, आपल्याला ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, आणि लोकांनाही ‘दवाई भी कडाई भी’ असे वागण्यासाठी वचनबद्ध करायचे आहे, असं ते म्हणाले.
खेळाडूंचं केलं अभिनंदन
पंतप्रधानांनी आजच्या मन की बातमध्ये विविध क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. ते म्हणाले की, मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली. भारताच्या महिला आणि पुरुष नेमबाजांनी जबरदस्त कामगिरी केली. याचदरम्यान पी.व्ही. सिंधूनेही सिल्व्हर मेडल जिंकलं. मिताली राज या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्या आहेत. त्यांचे ह्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत 7000 धावा काढणाऱ्या त्या एकमेव आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू आहेत, असं ते म्हणाले.
शेतीबरोबरच मधमाशी पालन देखील करावे
पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझी इच्छा आहे की देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतीबरोबरच मधमाशी पालन देखील करावे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढेल आणि त्यांचे जीवन देखील सुमधुर होईल.