(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधानांच्या हस्ते चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे उद्घाटन, ममता बॅनर्जी म्हणाल्या...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे उद्घाटन झाले. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केलीय.
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या (CNCI) दुसऱ्या संकुलाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते. या परिसरामुळे, पश्चिम बंगालच्या लोकांना विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीयांना उत्तम दर्जाच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील. देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही आज एक आणखी मोठे पाऊल उचलले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. मात्र, यावर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान ज्या प्रकल्पाचे आज उद्घाटन करत आहेत, त्याचे उद्घाटन राज्य सरकारने खूप पूर्वीच केल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
CNCI चे दुसरे संकुल 540 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले गेले आहे, त्यापैकी सुमारे 400 कोटी रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित पश्चिम बंगाल सरकारने 75:25 च्या प्रमाणात प्रदान केले आहेत. हे संकुल म्हणजे कर्करोगाचे निदान, प्रकार, उपचार आणि काळजी यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह 460 खाटांचे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र युनिट आहे. हे संकुल न्यूक्लियर मेडिसिन (पीईटी), 3.0 टेस्ला एमआरआय, 128 स्लाइस सीटी स्कॅनर, रेडिओन्यूक्लाइड थेरपी युनिट, एंडोस्कोपी सूट, आधुनिक ब्रेकीथेरपी युनिट इत्यादी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे संकुल विशेषत: देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागातील कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी एक प्रगत कर्करोग संशोधन सुविधा म्हणून देखील काम करेल आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करेल. आपण 2022 या वर्षाची सुरुवात 15-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठीच्या लसीकरणाने केली आहे. त्याचवेळी पहिल्या महिन्याच्या पहिल्याच सप्ताहात, आपण लसींच्या 150 कोटी मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा देखील पार करतो आहोत. एका वर्षांपेक्षा कमी काळात लसीच्या 150 कोटी मात्रा देण्याचे उद्दिष्ट गाठणे ही महत्त्वाची कामगिरी असून, देशाच्या प्रबळ इच्छाशक्तीचे हे प्रतीक आहे. यातून देशाचा नवा आत्मविश्वास,आत्मनिर्भरता आणि अभिमान व्यक्त होतो, असेही त्यांनी सांगितले. देशात सध्या ओमायक्रॉनमुळे कोविड रुग्णसंख्या वाढते आहे, अशावेळी 150 कोटी लसींच्या मात्रांना अधिकच महत्व प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज, देशातील 90 टक्के प्रौढ जनतेला लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे. केवळ पांच दिवसांत, दीड कोटींपेक्षा अधिक कुमारवयीन मुलांनाही लसींच्या मात्रा देण्यात आल्या. हे देशातील प्रत्येक सरकारचे आणि देशाचे यश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी विशेषत: देशातले वैज्ञानिक आणि लस उत्पादकांसह, आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. केंद्र सरकार तर्फे आतापर्यंत पश्चिम बंगाल सरकारला कोविड-19 लसीच्या 11 कोटी मात्रा मोफत देण्यात आल्या आहेत. 1,500 व्हेंटिलेटर्स, 9,000 ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवले असून 49 पीएसए प्लँट पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.
देशातील आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन आणण्यासाठी, प्रतिबंधात्मक आरोग्यसुविधा, परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा यासाठी मिशन मोडवर अभियान सुरु आहेत. औषधे आणि इतर वस्तूंचा पुरवठा याची गती वाढवण्यात आली आहे. योग, आयुर्वेद, फिट इंडिया अभियान, सार्वत्रिक लसीकरण अशा उपाययोजनांमुळे प्रतिबंधात्मक आरोग्यव्यवस्था मजबूत होत आहे, असे ते म्हणाले. त्याच वेळी, स्वच्छ भारत मिशन आणि हर घर जल योजनेमुळेही आरोग्य सुधारणेला बळ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना कर्करोग झाल्यास, त्याच्या महागड्या उपचारांमुळे गरिबांच्या मनात भीती निर्माण होते होती असे पंतप्रधान म्हणाले. आजारांची कारणे आणि परिस्थितीमुळे पुन्हा होणारे आजार या दुष्टचक्रातून गरिबांची सुटका करण्यासाठी देशात, स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होईल अशी उपचार सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे, असेही मोदी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात,कर्करोगावरील उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किंमती लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्या आहेत. देशभरात, आठ हजार पेक्षा अधिक जन औषधी केंद्रांमध्ये औषधे आणि सर्जिकल उपकरणे अतिशय कमी दरात उपलब्ध होत आहेत. या केंद्रांमध्ये कर्करोगासाठी लागणारी 50 पेक्षा अधिक औषधं अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत.
CNCI अर्थात चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे दुसरे संकुल देशाच्या सर्व भागात आरोग्य सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार बांधण्यात आले आहे. CNCI ला कर्करोगाच्या रूग्णांचा मोठा भार पडत होता आणि काही काळापासून विस्ताराची गरज भासत होती. ही गरज दुसऱ्या संकुलाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: