(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पेन्शनधारकांनी 'हे' काम 31 डिसेंबरपर्यंत निकाली काढावे, अन्यथा पेन्शन होऊ शकते बंद !
सरकारी पेन्शनधारकांना दरमाहा येणारी पेन्शन बंद करायची नसल्यास त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट करणं अनिवार्य आहे.
नवी दिल्ली : तुम्ही सरकारी पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. कारण पेन्शनधारकांनी 31 डिसेंबर 2021 पर्यंत जीवन सन्मान पत्र किंवा जीवन प्रमाणपत्र सादर केलं नाही तर पेन्शनचे पेमेंट थांबेल अशी माहिती आहे. या अगोदर प्रमाणपत्र सादर करण्याची मर्यादा 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत होती.
विशेष म्हणजे पेन्शनधारकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय पेन्शन मिळवण्यासाठी त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावं लागतं. जीवन प्रमाणपत्र सादर केल्यावर पेन्शनधारक जिवंत आहे की नाही हे स्पष्ट होईल.पण जर तुम्हाला हे जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ते तुम्ही सहजपणे मिळवू शकता आणि सादरही करु शकता. कसं हे जाणून घ्या...
जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन कसं मिळवाल?
निवृत्ती वेतनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र बनवण्यासाठी स्वतः जाण्याची गरज नाही. जीवन प्रमाणपत्र स्वतः ऑनलाइन देखील तयार केले जाऊ शकते. तुम्ही केंद्र सरकारच्या जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वरून डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र तयार करू शकता. आधार आधारित प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जाऊ शकते.
डोअर स्टेप सेवेद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करा
निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने दिलेल्या माहितीनुसार पेन्शनधारक 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या डोअर स्टेप बँकिंग अलायन्स किंवा पोस्ट विभागाच्या द्वारे सेवा वापरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. डोअरस्टेप बँकिंग अलायन्स ही सार्वजनिक क्षेत्रातील बारा बँकांमधील युती आहे, ज्यात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँकेचा यामध्ये समावेश आहे.
अशा प्रकारे सादर करा सर्टिफिकेट
जर तुम्ही जीवन प्रमाणपत्र डिजिटल पद्धतीने जमा करू शकत नसाल तर, तुमची पेन्शन येते त्या बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही ते जमा करू शकता. याशिवाय, तुम्ही केंद्रीय पेन्शन कार्यालयात जाऊनही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Share Market crash : शेअर बाजारात हाहा:कार, सेन्सेक्स 1800 अंकांनी कोसळला
- दोन महिन्यांपासून शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड; किरकोळ गुंतवणूकदारांच्या कमाईला लागले ग्रहण!
- New Labor Code : आठवड्यात तीन दिवस सुट्टी, चार दिवस काम? 'टेक होम सॅलरी' घटणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha