16 October In History : बंगालच्या फाळणीला सुरूवात अन् देशभरात असंतोष, पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधानांची गोळ्या घालून हत्या; आज इतिहासात
On this day in history 16 October : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान (Liaquat Ali Khan) यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
16th October In History : आजचा दिवस हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. फोडा आणि राज्य करा या तत्वानुसार ब्रिटिशांनी भारतात हिंदू आणि मुस्लिमांच्या एकतेला तडा देण्याची रणनीती आखली आणि बंगालच्या फाळणीचा घोषणा केली. आजच्या दिवशी म्हणजे 16 ऑक्टोबर 1905 रोजी बंगालच्या फाळणीची सुरूवात झाली. तसेच बॉलिवूडसाठीही आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी ड्रीम गर्ल हेमा मालिनीचा जन्म झाला.
आजच्या दिवशी घडलेल्या इतिहासातील इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे,
1854 : ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म
आयरिश लेखक आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म. 'कलेसाठी कला' या मताचे कट्टर पुरस्कर्ते. त्यांच्या नाटकांची मराठीतही रुपांतरे होऊन ती रंगभूमीवरही आली आहेत. वि. वा. शिरवाडकरकृत 'दूरचे दिवे' हे नाटक 'अॅन आयडियल हजबंड'चे रुपांतर आहे. 1963 मध्ये त्यांचे साहित्य 'द वर्क्स ऑफ ऑस्कर वाइल्ड' या नावाने संकलित झाले आहे.
1905 : बंगालच्या फाळणीच्या अंमलबजावणीला सुरूवात (Partition of Bengal)
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतिकारी कारवाया वाढू लागल्या होत्या. त्यामध्ये महाराष्ट्र आणि बंगाल हे दोन प्रांत त्याचे केंद्रबिंदू होते. त्यावेळचा बंगाल हा प्रांत आताचा पश्चिम बंगाल, बांग्लादेश, ओडिशा बिहारचा काही भाग असा मोठा होता. या प्रांतात हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात होती. वाढत्या क्रांतिकारी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी त्या वेळचा ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड कर्झनने ( Lord Curzon) फोडा आणि राज्य करा (Divide And Rule) ही नीती अवलंबली.
त्याचाच एक भाग म्हणून कर्झनने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची (Partition of Bengal) घोषणा केली. यानुसार बांग्लादेश हा मुस्लीम बहुल प्रांत आणि बंगाल आणि ओ़डिशा हा हिंदू बहुल प्रांत अशा दोन भागात ही फाळणी करण्यात आली. या फाळणीला प्रशासकीय कारण सांगितलं गेलं असलं तरीही त्यामागचा हिंदू आणि मुस्लिमांमध्ये फूट पाडून स्वातंत्र्यलढा कमकुवत करण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न लपून राहिला नव्हता.
कर्झनने केलेल्या या फाळणीची अंमलबजावणी 16 ऑक्टोबर 1905 रोजी सुरू झाली. त्याला विरोध म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने लढा उभा केला, स्वदेशीचा नारा दिला. बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे 'वंदे मातरम' (Vande Mataram) हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले. आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात (Indian national Congress) स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा करण्यात आली. टिळकांनी यालाच चतुःसूत्री असे नाव दिले. भारतीयांच्या वाढत्या दबावानंतर 1911 साली बंगालच्या फाळणीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला.
1946 : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा आज जन्मदिवस
ओडिशा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांचा आज जन्मदिवस. बिजु जनता दल पक्षाचे संस्थापक असलेले पटनायक एक लेखक देखील आहेत.
1948 : अभिनेत्री हेमा मालिनी यांचा जन्मदिन (Hema Malini Birthday)
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी झाला. त्या सध्या खासदार देखील आहेत. त्यांनी 1968 सालच्या सपनो का सौदागर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हेमा मालिनी यांनी अंदाज, लाल पत्थर, ड्रीम गर्ल, शोले इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका केली. 1970 च्या दशकामध्ये ती बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी व प्रसिद्ध अभिनेत्री अशी त्यांची ओळख. 1972 सालच्या सीता और गीता चित्रपटामधील दुहेरी भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. 1980 साली हेमा मालिनी यांनी अभिनेता धर्मेंद्र सोबत विवाह केला. 2000 साली मध्ये भारत सरकारने चित्रपटसृष्टीमधील योगदानासाठी हेमा मालिनीला पद्मश्री पुरस्कार बहाल केला.
1959 : मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अजय सरपोतदार यांचा जन्म. ते अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष होते.
1944 : उद्योजक गुरुनाथ प्रभाकर ओगले याचं निधन: 'प्रभाकर कंदिल'चे निर्माते, ओगले काच कारखान्याचे एक संस्थापक
1948 : माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचं निधन . जळगाव येथे झालेल्या 34 व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष.
1951 : पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या (Liaquat Ali Khan)
लियाकत अली खान हे पाकिस्तानाचे पहिले पंतप्रधान होते. भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होऊन वेगळे होण्यापूर्वीच्या 1946 सालातील भारताच्या अंतरिम शासनाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते. ते मुस्लिम लीगेचे अध्यक्ष व पाकिस्तानाचे पहिले गव्हर्नर जनरल मुहम्मद अली जीना यांच्या विश्वासू वर्तुळातील राजकारणी होते. लियाकत यांची एका अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली. लियाकत अली खान हे एका रॅलीत सहभागी होण्यासाठी आले असता, त्यांची 16 ऑक्टोबर 1951 रोजी अज्ञात इसमाने गोळ्या झाडून हत्या केली.
1956 : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूरमध्ये जवळपास 3 लाख अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
1968 : हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान
1973 : हेन्री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
1975 : बांगला देशातील रहिमा बानू ही 2 वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.
1984 : नोबेल शांति पुरस्काराने आर्चबिशप डेसमंड टुटू यांना सन्मानित करण्यात आले.
1986 : रिइनॉल्ड मेस्नर हे 8000 मीटर पेक्षा उच्च असणारी 14 शिखरे सर करणारे पहिली व्यक्ती ठरले.
1994 : पश्चिम बंगाल येथील भारतीय स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक आणि राजकारणी गणेश घोष यांचे निधन.
16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन
दरवर्षी 16 ऑक्टोबर रोजी जागतिक अन्न दिन (World Food Day) साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (Food and Agriculture Organization, FAO) जागतिक अन्न दिन हा उपक्रम सुरू केला. 1981 मध्ये पहिल्यांदा जागतिक अन्न दिन साजरा केला गेला होता. त्यानंतर हा दिवस दरवर्षी जगभरात 150 शहरांमध्ये साजरा केला जातो. उपासमारी पिडीतांना मदत करणे तसेच अन्नाचे महत्व सर्वांना सांगणे हे उद्देश जागतिक अन्न दिनाचे आहेत.
ही बातमी वाचा: