Parliament Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून, 'या' मुद्यावरुन विरोधक सरकारला घेरणार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र उद्यापासून ( 14 मार्च) सुरु होत आहे. यावेळी दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे.
Parliament Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र उद्यापासून ( 14 मार्च) सुरु होत आहे. दुसऱ्या भागात, सरकारचे सर्वात मोठे प्राधान्य म्हणजे सामान्य अर्थसंकल्प आणि वित्त विधेयक मंजूर करणे हे आहे. अधिवेशनाच्या पहिल्या भागात दोन्ही सभागृहांचे कामकाज वेगवेगळ्या वेळी झाले. राज्यसभेचे कामकाज सकाळी 10 वाजता तर लोकसभेचे कामकाज दुपारी 4 वाजता सुरु होत होते. मात्र, यावेळी दोन्ही सभागृहांचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु होणार आहे.
या सत्रात महागाई, बेरोजगारी आणि युक्रेनच्या संकटावरुन विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाने खूश झालेल्या मोदी सरकारसमोर विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांनाा उत्तर देण्याचे आव्हान असणार आहे.
सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. परिस्थिती झपाट्याने पूर्वपदावर येत आहे, अशा परिस्थितीत संसदेचे कामकाज नेहमीप्रमाणे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही सभागृहांचे कामकाज त्यांच्या पारंपरिक वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 आणि नंतर दुपारी 2 ते सायंकाळी 6 अशी निश्चित करण्यात आली आहे.
दरम्यान, अशा स्थितीत या वेळी दोन्ही सभागृहांचे कामकाज किमान एक तास अधिक वेळ चालेल. पहिल्या भागात कामकाजासाठी दररोज केवळ 5 तास देण्यात आले होते. लोकसभेचे कामकाज दुपारी 4 वाजता सुरु होत असल्यानं, राज्यसभेचं कामकाज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी संपवावं लागत होतं. त्याचवेळी लोकसभेच्या कामकाजाची नियोजित वेळ दुपारी चार ते रात्री नऊ अशी होती. मात्र, काहीवेळा त्यात एक-दोन तासांची वाढ करुन कामकाज पूर्ण केले जात होतं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र 14 मार्चपासून सुरु होणार असून, ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे. यादरम्यान दोन्ही सभागृहांच्या 19 बैठका होणार आहेत. राज्यसभेतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशनाच्या पहिल्या भागाच्या तुलनेत यावेळी दोन्ही सभागृहात 19 तास जास्त कामकाज होणार आहे. सभागृहातील सरकारी कामकाजाचा निपटारा करण्यासाठी 64 तासांपेक्षा जास्त वेळ उपलब्ध असेल. याशिवाय पूर्वीप्रमाणेच आता प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य तासासाठी दररोज दोन तासांचा वेळ देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: