Agnipath Protest : हिंसक आंदोलनाचा 340 ट्रेनला फटका, रेल्वेचे तब्बल 40 कोटींहून अधिक नुकसान
Agnipath Protest : अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनात 12 पेक्षा जास्त रेल्वेचे डबे जळाले असून त्यात 7 LHB डबे आणि 5 जनरल ICF डबे आहेत. आंदोलनामुळे रेल्वेचे आतापर्यंत जवळपास 40 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
![Agnipath Protest : हिंसक आंदोलनाचा 340 ट्रेनला फटका, रेल्वेचे तब्बल 40 कोटींहून अधिक नुकसान over 340 trains affected amid agnipath violent protests across country railways lost more than 40 crores Agnipath Protest : हिंसक आंदोलनाचा 340 ट्रेनला फटका, रेल्वेचे तब्बल 40 कोटींहून अधिक नुकसान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/17/ba9977baf77077e319013b7d1cf2091b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Agnipath Protest : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरात गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आतापर्यंत 340 रेल्वे गाड्यांना फटका बसला आहे. तर हजारो प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला आहे. अग्निपथच्या आंदोलनामुळे रेल्वेचे आतापर्यंत जवळपास 40 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. "देशाच्या मालमत्तेचे नुकसान करू नये, संवादातून समस्येवर तोडगा काढण्याचा मार्ग अवलंबावा, असे आवाहन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना केले आहे.
अग्निपथ योजनेविरोधातील आंदोलनात 12 पेक्षा जास्त रेल्वेचे डबे जळाले असून त्यात 7 LHB डबे आणि 5 जनरल ICF डबे आहेत. 94 मेल एक्स्प्रेस गाड्या आणि 140 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 65 मेल एक्सप्रेस गाड्या आणि 30 पॅसेंजर गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. यासोबतच 11 मेल एक्सप्रेस गाड्याही वळवण्यात आल्या आहेत.
देशात धावणार्या बहुतेक सामान्य गाड्यांना ICF कोच असतात. चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून बनवलेल्या कॉमन रेल्वे कोचला ICF कोच म्हणतात. त्याचे बांधकाम 1955 मध्ये सुरू झाले, परंतु त्याचे उत्पादन 2018 मध्ये थांबवण्यात आले. जेणेकरून भविष्यात केवळ आधुनिक LHB कोच वापरता येतील.
जर्मनीच्या लिंक हॉफमन बुश कंपनीच्या डिझाइनवर बनवलेल्या डब्यांना एलएचबी कोच म्हणतात. हे डबे कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरी (RCF, कपूरथला) येथे भारतात तयार केले जातात. हे कोच 2000 पासून देशातील ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकवर धावण्यासाठी तयार केले जात आहेत. येथे एका वर्षात 250 डबे बनवले जातात. हा आधुनिक कोच 160 ते 200 किमी प्रतितास या वेगाने धावू शकतो. त्याची बेसिक स्टील फ्रेम अतिशय मजबूत असून प्रवाशांना त्याचा धक्का जाणवत नाही. त्याचा बाहेरचा भाग स्टेनलेस स्टीलचा आणि आतील भाग अॅल्युमिनियमचा बनलेला आहे, त्यामुळे ते वजनाने हलके आहेत.
एक नॉन-एसी आयसीएफ कोच बनवण्यासाठी 90 लाख रुपये खर्च येतो. तर एसी आयसीएफ कोच बनवण्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च येतो. नॉन एसी एलएचबी कोच बनवण्यासाठी 2.25 कोटी रुपये खर्च येतो. दुसरीकडे, एसी एलएचबी कोच बनवण्यासाठी 3 कोटी रुपये लागतात.
पाच हजार हॉर्स पॉवरपर्यंतचे लोकोमोटिव्ह बनवण्यासाठी 15 कोटी रुपये, तर 12 हजार हॉर्स पॉवरपर्यंतचे इंजिन बनवण्यासाठी 65 कोटी रुपये खर्च येतो . सामान्य ट्रेनला 24 डबे असतात. म्हणजेच इंजिनसह संपूर्ण ट्रेनची सरासरी किंमत किमान 51 कोटी रुपये असते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)