MP Suspended In Parliament : विरोधक मुक्त संसद! खासदारांच्या निलंबनानंतर दोन्ही सभागृहात विरोधी बाकांवर किती खासदार?
MP Suspended In Parliament : मंगळवारी पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता विरोधकमुक्त संसद झाली आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Parliament MP Suspended : संसदेच्या सुरक्षेच्या मुद्यावर गृहमंत्र्यांनी सभागृहात निवेदन करावे यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे. मात्र, हा आग्रह विरोधी पक्षांना चांगलाच महागात पडला आहे. मंगळवारी पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेत विरोधी पक्षाच्या खासदारांवर निलंबनाची (MP Suspended In Parliament) कारवाई करण्यात आली. आज लोकसभेतून 49 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यामुळे दोन्ही सभागृहातून आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या खासदारांची एकूण संख्या 141 वर पोहोचली आहे.
विरोधी बाकांवरील खासदारांवर मागील तीन दिवसांपासून निलंबनाची कारवाई सुरू आहे. त्यामुळे आता संसदेचे सभागृह खरेच विरोधी पक्षमुक्त झाले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हिवाळी अधिवेशनाला अजून तीन दिवस बाकी आहेत. यापुढे कोणतेही अधिवेशन चालणार नाही आणि पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.
दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाचे मोजकेच खासदार
लोकसभेत भाजप आणि मित्रपक्षांचे 300 हून अधिक खासदार आहेत. दुसरीकडे, संसदेच्या या कनिष्ठ सभागृहात विरोधकांकडे निलंबनाच्या कारवाईनंतर फक्त 100 खासदार शिल्लक आहेत. राज्यसभेतही आता विरोधी पक्षाकडे 100 पेक्षा कमी खासदार शिल्लक आहेत. आंध्र प्रदेशचा सत्ताधारी पक्ष वायएसआर काँग्रेस पक्ष आणि ओदिशाचा बिजू जनता दल यांच्या खासदारांवर कोणतीच कारवाई झाली नाही. याचा अर्थ या पक्षांचे खासदार पूर्ण संख्याबळा इतकेच आहेत. या पक्षांच्या खासदारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर या आधी भाजपला पाठिंबा दिला आहे.
लोकसभेत एकूण 522 खासदार आहेत. मंगळवारी खासदारांवर झालेल्या कारवाईमुळे विरोधी बाकांवर आता 100 च्या आसपास खासदार आहेत. त्यातही विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे 133 खासदार होते. निलंबनाची कारवाई झालेले आणि कारवाई सुरू असलेले असे एकूण 95 खासदार आहेत. त्यामुळे आता इंडिया आघाडीकडे 38 खासदारच लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात.
राज्यसभेत 238 खासदार आहेत. विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीचे 95 खासदार आहेत. आतापर्यंत 46 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे 'इंडिया' आघाडीकडे आता 49 खासदार राहिले आहेत. राज्यसभेत भाजपचे 93 खासदार आहेत.
निलंबित खासदारांमध्ये अनेक महत्त्वाची नावे
लोकसभेत सभापतींचा अवमान केल्याप्रकरणी 49 विरोधी सदस्यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले होते. याआधी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लोकसभेच्या 33 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित करण्यात आले होते. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये दानिश अली, प्रतिभा सिंह, दिनेशचंद्र यादव, शशी थरूर, सुप्रिया सुळे, डिंपल यादव आदींची नावे आहेत. त्याचवेळी निलंबित खासदारांनी सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन केले.