Air Defense System : एअर डिफेन्स रडार सिस्टिम म्हणजे काय, नेमकी काम कशी करते? भारताच्या S-400 पुढं पाकच्या HQ-9 चा बार फुसका
Operation Sindoor : भारतानं पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला उद्धवस्त केलं आहे. भारताच्या S-400 पुढं पाकिस्तानच्या HQ-9 चा निभाव लागला नाही.

नवी दिल्ली : भारतानं पाकिस्तानची लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली आहे. भारतीय लष्करानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. कर्नल सतीश ढगे यांनी एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त होणं म्हणजे काय सांगितलं आहे. भारतानं पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली असेल तर आपल्या इलेक्ट्रॉकि वॉर फेअर सूटचा हा खूप मोठा विजय आहे. एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून, रडारच्या माध्यमातून भारतातून येणारी पाकच्या दिशेनं जाणारी विमानं, मिसाईल पकडण्याची क्षमता प्राप्त होते. भारतानं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या माध्यमातून कारवाया केल्यानं त्यांचं नेटवर्क जामिंग करण्यात आलं. त्यांचं एअर डिफेन्स उद्धवस्त केल्यानं भारताच्या हवाई दलाला किंवा मिसाईलच्या माध्यमातून कारवाई करायची असेल तर पाकिस्तान दुबळा झालाय, असं सतीश ढगे म्हणाले. पाकिस्ताननं भारतातील 15 ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुजचा समावेश होता.
मेजर जनरल अनिल बाम काय म्हणाले?
बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स सुदृढ असल्यानं आपण त्यांच्या मिसाईल हवेत उडवून लावल्या आहेत. लाहोरमधील अँटी डिटेक्शन आणि अँटी मिसाईल सिस्टीम आणि रडार आपण उद्धवस्त केले आहेत, असं अनिल बाम म्हणाले. लाहोरची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केल्यानं पाकिस्तान कमजोर होणार नाही. कारण विविध ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टीम लावलेली असते. विविध पर्याय असतात, आपल्याकडे मारक क्षमता असल्यानं आणि ठिकाणांची माहिती असल्यानं आपण त्याला नष्ट करु शकतो, असं अनिल बाम म्हणाले. पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीम कुठं आहेत हे भारताला माहिती आहे. पहिल्या टप्प्यात भारतानं आघाडी घतेल्याचं अनिल बाम म्हणाले.
चीननं पाकिस्तानला एअर डिफेन्स सिस्टीम दिलेली
HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं (CPMIEC) विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा (Surface-to-Air Missile – SAM) करणारी क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केलेला. याची रेंज 125 ते 200 किलोमीटर असल्याचं सांगितलं जातंय. त्यात एकाच वेळी 100 लक्ष्यांचा मागोवा घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
भारताकडून करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान खूपच चिंतेत पडलं होतं. त्यामुळे त्यांनी तात्काळ HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली वापरण्याचा निर्णय घेतला. भारताची राफेल लढाऊ विमानं, सुखोई एसयू-30 एमकेआय आणि ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ही पाकिस्तानसाठी मोठी आव्हानं ठरणार आहेत. त्यामुळेच पाकिस्ताननं HQ-9 सारख्या क्षेपणास्त्र प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला. पण, आता भारतानं ड्रोनमार्फत पाकिस्तानची HQ-9 क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त केल्यामुळे आता पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
तसेच HQ-9 बद्दलचे सत्य जाणून घ्या
पाकिस्तानी लोक चीनच्या HQ-9 ची तुलना भारताच्या S-400 हवाई संरक्षण प्रणालीशी करतात. पाकिस्तानी काहीही म्हणोत, पण सत्य हे आहे की, पाकिस्तानला चीनकडून मिळालेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम तांत्रिकदृष्ट्या S-400 समोर अजिबात टिकू शकत नाही. दोघांची तुलना करणंही वेळ वाया घालवण्यासारखं आहे. HQ-9 ची रडार प्रणाली भारताच्या ब्राह्मोस सारख्या सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकेल, याचा विचार करणंही अशक्य आहे. S-400 ची मारा करण्याची क्षमता 400 किलोमीटर आहे आणि ती खूप कमी वेळात कार्यान्वित होऊ शकते. त्या तुलनेत, HQ-9 तैनात करण्यासाठी फक्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागतो.
दरम्यान, एएनआयच्या माहितीनुसार भारतानं S-400 हवाई संरक्षण प्रणालीचा वापर केला. मल्टी रोल, मल्टी टारगेट एंगेजमेंट सिस्टीम आहे. ही रशियाकडून घेतली होती. ही फोर्थ जरनेशन आहे. अक्विझिशन,ट्रॅकिंग, लाँचिंग त्यानंतर डिस्ट्रक्शन होतं. ही यंत्रणा इंटीग्रेटेड आहे. S-400 द्वारे फायर केल्यानंतर हवाई हद्द सुरक्षित होते, असं अनिल बाम म्हणाले.भारताची बॅलेस्टिक मिसाईल डिफेन्स हे पूर्णपणे परिणामकारक असून भारताचा सीमाभाग सुरक्षित असल्याचं बाम म्हणाले.
भारताचं सुदर्शन चक्र, S-400 ची वैशिष्ट्ये
- S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते.
- ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यात सक्षम आहे.
- भारताने ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली आहे.
- ही मिसाईल अत्याधुनिक फाइटर जेट्सलाही मारून पाडण्याची क्षमता ठेवते.
- S-400 एकावेळी 72 मिसाईल्स लाँच करू शकते.
- ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते.
S-400 मिसाईल सिस्टीमची ताकद:
- S-400 ला जगातील सर्वोत्तम एअर डिफेन्स सिस्टीम मानले जाते.
- ही सिस्टीम रशियाने तयार केली आहे.
- सुमारे 5 अब्ज डॉलर्सच्या करारानंतर 2018 मध्ये भारताने ही मिसाईल सिस्टीम खरेदी केली.
- या करारात भारताने 5 युनिट S-400 मिसाईल सिस्टीम्स खरेदी केल्या.
- S-400 ही मोबाईल लाँग-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल सिस्टीम आहे.
- ही प्रणाली स्टेल्थ फाइटर जेट, बॉम्बर्स, क्रूज व बॅलिस्टिक मिसाईल्स आणि UAV (ड्रोन) यांना लक्ष्य करू शकते.
- यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईल्स असतात, ज्या 400 किमी अंतरावरील टार्गेटवर हल्ला करू शकतात.
- यात दोन स्वतंत्र रडार सिस्टीम्स आहेत, ज्या 600 किमीपर्यंतच्या हवाई टार्गेट्सचा शोध घेऊ शकतात.
- एकावेळी 80 हवाई टार्गेट्स वर नजर ठेवून त्यांना लक्ष्य करू शकते.
- सिस्टीम सक्रिय झाल्यानंतर केवळ 3 मिनिटांत फायरिंगसाठी तयार होते.
- यामुळे शत्रूचा हल्ला तत्काळ निष्फळ केला जाऊ शकतो.
भारताने उद्ध्वस्त केलेली पाकिस्तानची HQ-9 हवाई संरक्षण यंत्रणा नेमकी काय?
- HQ-9 ही चीनने (CPMIEC) विकसित केलेली सुरक्षा यंत्रणा आहे.
- हवाई हल्ले रोखणे आणि प्रतिकार करण्यासाठी ही यंत्रणा वापरली जाते.
- एकाचवेळी 100 टार्गेट ट्रॅक करुन ते उद्ध्वस्त करण्याची क्षमता या यंत्रणेची होती, हीच यंत्रणा भारताने उद्ध्वस्त केली
- जमिनीवरुन हवेत मारा करणारी (Surface-to-Air Missile – SAM) क्षेपणास्त्र (SAM) प्रणाली आहे.
- ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते.
- 2021 मध्ये पाकिस्ताननं आपल्या ताफ्यात तिचा समावेश केला होता.
- राफेल, सुखोई आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसारख्या भारताच्या हवाई धोक्यांना रोखसाठी पाकिस्तानने चीनकडून यंत्रणा घेतली होती.
























