(Source: ECI/ABP News/ABP Majha)
25 October In History : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात, साहिर लुधियानवी यांची पुण्यतिथी
On This Day In History : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला 25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरुवात झाली होती. 25 ऑक्टोबर रोजी देशातील लोकसभेच्या 489 आणि विधानसभेच्या 3283 जागांसाठी मतदान झाले होते.
मुंबई : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीला 25 ऑक्टोबर 1951 रोजी सुरुवात झाली होती. 25 ऑक्टोबर रोजी देशातील लोकसभेच्या 489 आणि विधानसभेच्या 3283 जागांसाठी मतदान झाले होते. त्यावेळी भारतात 17 कोटी 32 लाख 12 हजार 343 मतदार होते. त्यापैकी 10 कोटी 59 लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज साहिर लुधियानवी यांची पुण्यतिथी देखील आहे. साहिर हे भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार तसेच कवी होते. साहिर यांचा जन्म 8 मार्च 1921 रोजी लुधियाना येथे झाला आणि 25 ऑक्टोबर 1980 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले. साहिर यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा इक्बाल, फैज, फिराक या सारख्या कवींचे वर्चस्व होते. मात्र आपल्या लिखाणाच्या वेगळ्या शैलीमुळे साहिर हे प्रसिद्ध झाले.
1881: प्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांची जयंती
पाब्लो पिकासो (1881-1973) हे स्पॅनिश चित्रकार होते. ते विसाव्या शतकातील सर्वात चर्चित, वादग्रस्त आणि समृद्ध कलाकारांपैकी एक होते. पिकासो यांची चित्रे मानवी दु:खाचे जिवंत दस्तावेज आहेत, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.
1937: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे यांची जयंती
डॉ. अशोक दामोदर रानडे हे भारतीय शास्त्रीय संगीत विशारद, समीक्षक आणि लेखक होते. भारतीय कला आणि संस्कृतीचे अभ्यासक, भाष्यकार, प्रयोगशील संगीतकार, गायक, साहित्यिक आणि अध्यापक अशा विविध नात्यांनी त्यांनी 50 हून अधिक वर्षे संगीत क्षेत्रात काम केले आहे.
2012: विनोदी अभिनेते जसपाल भट्टी यांची पुण्यतिथी
80 च्या दशकातील टीव्ही प्रेक्षक कधीही विसरणार नाहीत असे नाव म्हणजे जसपाल भट्टी. 3 मार्च 1955 रोजी अमृतसरमध्ये जन्मलेले जसपाल हे असे कलाकार होते जे गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडून लोकांना खूप हसवत होते. ते दूरदर्शनच्या 'फ्लॉप शो' आणि 'उलटा पुल्टा' शोसाठी ओळखले जातात.
आजच्या दिवशी घडलेल्या इतर महत्वाच्या घटना :
1711 : इटलीतील दोन प्राचीन ऐतिहासिक शहरे पॉम्पेई आणि हर्क्युलेनियमचे अवशेष एका गावकऱ्याने शोधून काढले.
1870 : अमेरिकेत पहिल्यांदा पोस्टकार्डचा वापर करण्यात आला.
1924 : इंग्रजांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अटक करून दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवले.
1955 : पहिल्यांदा टप्पन नावाच्या कंपनीने घरगुती वापरासाठी मायक्रोवेव्ह ओव्हन विकण्यास सुरुवात केली.
1960 : न्यूयॉर्कमधील पहिले इलेक्ट्रॉनिक मनगटी घड्याळ बाजारात आले.
1990 : मेघालयचे पहिले मुख्यमंत्री कॅप्टन संगमा यांचे निधन.
2005 : हिंदी लेखक निर्मल वर्मा यांचे निधन.
2009 - बगदादमध्ये झालेल्या दोन आत्मघाती बॉम्बस्फोटात किमान 155 लोक ठार झाले.