21 November In History : स्वतंत्र भारताचे पहिले टपाल तिकीट जारी, ग्रामोफोनचा लागला शोध
Today Dinvishesh: 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने पहिले टपाल तिकीट जारी केले. ज्याची किंमत साडेतीन आणे निश्चित करण्यात आली. 'जय हिंद' या नावाने जारी झालेल्या या टपाल तिकिटावर मध्यभागी तिरंग्याचे चित्र होते.
On This Day In History : 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या सरकारने पहिले टपाल तिकीट जारी केले. ज्याची किंमत साडेतीन आणे निश्चित करण्यात आली. 'जय हिंद' या नावाने जारी झालेल्या या टपाल तिकिटावर मध्यभागी तिरंग्याचे चित्र होते. तर डावीकडे इंग्रजीत त्याची किंमत म्हणजे साडेतीन आणे लिहिली होती. तिरंग्याच्या खाली 'इंडिया' लिहिलेले होते आणि तिरंग्याशेजारी 15 ऑगस्ट 1947 लिहिलेले होते. टपाल तिकीट म्हणावं, असा तो निळ्या रंगाचा कागदाचा छोटासा तुकडा होता. पण खरं तर इतिहासाच्या पानांवरील स्वतंत्र भारताची पहिली स्वाक्षरी, संपूर्ण जगासमोर भारताच्या विजयाची घोषणा करणारा होता.
1877: ग्रामोफोनचा शोध लागला
1877 मध्ये थॉमस अल्वा एडिसन यांनी जगातील पहिला फोनोग्राफ बनवला. या फोनोग्राफमध्ये आवाज रेकॉर्ड करून आणि नंतर एकला जाऊ शकत होता. हा एक अपघाती शोध होता. एडिसन टेलिग्राफ आणि टेलिफोनशी संबंधित शोध लावत होते. कागदाच्या टेपवर संदेश रेकॉर्ड करण्यासाठी आणि नंतर ते टेलीग्राफद्वारे पाठवण्यासाठी ते एक मशीन बनवत होते. याचदरम्यान, त्यांना त्यांचाच रेकॉर्ड केलेला आवाज पुन्हा ऐकू आला. एडिसनने "मेरी हॅड अ लिटल लँब" कविता गात रेकॉर्ड केली आणि पुन्हा ऐकली. फोनोग्राफ नंतर ग्रामोफोन म्हणून ओळखला जाऊ लागला.
1926: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेमनाथ यांचा जन्म
अभिनेता प्रेमनाथ यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1926 रोजी पेशावर येथे झाला. प्रेमनाथ हे बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जवळपास 250 चित्रपटांमध्ये काम केलेल्या प्रेमनाथ यांनी 'जॉनी मेरा नाम', 'धर्मात्मा', 'बरसात', 'कालीचरण', 'प्राण जाए पर वचन न जाए', 'बॉबी' आणि 'लोफर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1985 मध्ये आलेला 'हम दोनों' हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. 3 नोव्हेंबर 1992 रोजी प्रेमनाथ यांचे निधन झाले.
1939 : मुलायम सिंह यादव जन्मदिन
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1939 मध्ये झाला. ते समाजवादी पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष होते. मुलायम सिंह यादव हे आजवर तीन वेळा उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री व 1996 ते 1998 दरम्यान केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री देखील राहिले होते. याच वर्षी 10 ऑक्टोबर रोजी त्यांचं निधन झालं.
1955 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 15 आंदोलक हुतात्मा झाले
संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात आंदोलने, सभा व मोर्चे सुरू झाले होते. तरीही भारत सरकारने या चळवळीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत होते. या चळवळीला मोरारजी देसाई, स. का. पाटील यांनी प्रथमपासून विरोध केल्याचे दिसून येत होता. परंतु जनतेच्या रेट्याने हे आंदोलन यशस्वी करण्यात आले. काँग्रेस वर्कींग कमिटीने त्रिराज्य योजना मांडली. याला संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र विरोध सुरू झाला. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत मांडणार होते. त्या विरोधात सेनापती बापट यांनी प्रचंड मोठा मोर्चा विधानसभेवर काढला. त्याच दिवशी सायंकाळी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी 50,000 हजार लोकांची सभा मुंबईत कामगार मैदानात घेतली व त्रिराज्य कल्पना फेटाळली व 21 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी देसाई व स. का. पाटील यांनी मुंबईच्या चौपाटीवर सभा घेतली व त्यावेळी लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या. परंतु मोरारजी देसाई यांनी 'हिंसक मार्गांचा वापर केल्यास मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही असे सांगितले. स. का. पाटील यांनी 'आकाशात चंद्र तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रालाही मिळणार नाही' अशी घोषणा केली. परिणामी चप्पल, दगड, गोटे यांचा मारा करून त्यांची ही सभा लोकांनी उधळून लावली. 21 नोव्हेंबर 1955 रोजी आंदोलकांनी कामगारांचा संप घडवून आणला. लोक ओव्हल मैदानावर जमू लागले. पोलीस बंदोबस्त कडक होता. मोरारजी देसाई सरकारने जमावबंदी आदेश मांडला. आदेशभंग केल्याबद्दल पोलिसांनी प्रथम लाठीमार केला. अश्रूधूर सोडला. नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात 15 आंदोलक हुतात्मा झाले व सुमारे 300 लोक जखमी झाले. 400 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. (संदर्भ: आजचा महाराष्ट्र, एम.ए भाग -1, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)
1962: भारत-चीन युद्धाला पूर्णविराम
20 ऑक्टोबर 1962 रोजी भारत आणि चीनमध्ये युद्ध सुरू झाले. चीनने भारतीय भूभागावर कब्जा केल्याच्या दाव्यानंतर दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते. महिनाभर चाललेल्या या युद्धात भारताच्या 11-12 हजार सैनिकांचा मुकाबला करण्यासाठी चीनने 80 हजारांहून अधिक सैनिक उतरवले होते. पूर्ण महिन्यानंतर, 20 नोव्हेंबर रोजी चीनने युद्धविराम घोषित केला. तसेच वादग्रस्त भागातून माघार घेण्याचे मान्य केले. यानंतर 21 नोव्हेंबर 1962 रोजी युद्ध संपले. या युद्धात भारताचे 1 हजार 383 जवान शहीद झाले. तर 722 चिनी सैनिक मारले गेले.