Om Prakash Chautala : माजी मुख्यमंत्री 'दसवी' पास! 87 व्या वर्षी दहावी-बारावी उत्तीर्ण, दिग्गजांकडून शुभेच्छा
हरियाणाचे (Haryana) माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे वयाच्या 87 व्या वर्षी दहावी आणि बारावी परीक्षेत पास झाले आहेत.
Om Prakash Chautala : सध्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांमध्ये शिक्षणाचाही समावेश केला जातो. शिक्षणाला वयाचे बंधन नसते, असं म्हटलं जातं. हरियाणाचे (Haryana) माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) हे वयाच्या 87 व्या वर्षी दहावी आणि बारावी परीक्षेत पास झाले आहेत. मंगळावारी (10 मे) त्यांना हरियाणा बोर्डनं गुणपत्रिका दिली. चौटाला यांनी 2021 मध्ये हरियाणा ओपन बोर्डाची बारावीची परीक्षा दिली होती. पण त्यांचा बारावी परीक्षेचा निकाल रोखण्यात आला होता कारण ते दहावीच्या परीक्षेमधील इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास झाले होते. त्यामुळे बारावीचा निकाल मिळण्यासाठी ओम प्रकाश चौटाला यांनी दहावीचा इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा सोडवला. या पेपरमध्ये त्यांना 100 पैकी 88 गुण मिळाले.
ओम प्रकाश चौटाला यांना शिक्षक भर्ती घोटाळा प्रकरणामुळे अटक करण्यात आली होती. दहा वर्ष शिक्षा भोगत असताना 2017 मध्ये चौटाला यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यावेळी इंग्रजी विषय सोडून इतर सर्व विषयामध्ये ते पास झाले होते.
दिग्गजांकडून शुभेच्छा
उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करून चौटाला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले, 'शिक्षण घेण्यासाठी वयाच्या मर्यादा नसते. चौटाला यांचे अभिनंदन.' तसेच दसवी चित्रपटामधील अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री निम्रत कौर यांनी देखील ओम प्रकाश चौटाला यांना शुभेच्छा दिल्या. 'बधाई' असं ट्वीट करुन अभिषेकनं चौटाला यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘दसवीं’ चित्रपटाची कथा
अभिषेक बच्चनच्या 'दसवी' या चित्रपटाचं कथानक देखील अशा व्यक्तीच्या जीवनावर आधारित आहे, ज्याच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट येतो, जेव्हा त्याला जेलमध्ये जावे लागते. त्यावेळी जीवनात शिक्षण किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्याला होते. तुरुंगात गेल्यावर तो दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतो. या दरम्यान त्याच्या मार्गात अनेक प्रकारची संकटही येतात.
संबंधित बातम्या