देशात जून-जुलैमध्ये कोरोना शिखरावर असेल, एम्सचे संचालक डॉ. गुलेरिया यांचा गंभीर इशारा
40 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही आपल्याकडे पेशंटच्या संख्येत घट होताना दिसत नाही. ही घट व्हायला सुरुवात होईल तेव्हाच कुठेतरी समाधान मानायला हवं आणि सध्या ते चित्र दूर असल्याचं डॉ. गुलेरिया यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचं भवितव्य काय असणार याबाबत एका जबाबदार व्यक्तीने सर्वात महत्वाचं वक्तव्य केलं आहे. जून-जुलैमध्ये कोरोनाचा प्रभाव सर्वात जास्त असू शकतो, असं एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया म्हणत आहेत. त्यामुळे कोरोनासंदर्भातली रणनीती किती काळजीनं आखणं गरजेचं आहे हे त्यांच्या वक्तव्यातून कळतंय.
कोरोनामुळे देशातले सर्व व्यवहार ठप्प आहेत. 135 कोटींचा देश 40 दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये आहे. पण म्हणून लगेच हे संकट संपलं असं तुम्ही समजत असाल तर सावध व्हा. भारतात जून-जुलैमध्ये कोरोनाचा प्रभाव सर्वाधिक वाढू शकतो, असा अंदाज एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तवला आहे.
देशातल्या कोरोना बाधितांच्या संख्येनं नुकताच 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. देशात कोरोनाच्या एकूण केसेस 52 हजार 952 तर आतापर्यंत 1783 जणांचा अशी सध्या देशातली आकडेवारी आहे. यात रिकव्हरी रेट म्हणजे पेशंट बरे होण्याचा आकडा अधिक असल्याचा दावा सरकार करत आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे मृत्यूदरही कमी आहे. पण गुलेरिया यांच्यासाठी सर्वात चिंतेची बाब म्हणजे 40 दिवसांच्या लॉकडाऊननंतरही आपल्याकडे पेशंटच्या संख्येत घट होताना दिसत नाही. ही घट व्हायला सुरुवात होईल तेव्हाच कुठेतरी समाधान मानायला हवं आणि सध्या ते चित्र दूर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
एम्सच्या संचालकांचं हे वक्तव्य खरंतर लॉकडाऊनच्या रणनीतीसाठीही महत्वाचं बनतं. कारण 40 दिवस लॉकडाऊन लावला म्हणजे आपलं काम झालं अशा अविर्भावात आता गाफील राहणं महागात पडू शकतं. ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत, तिथे अत्यंत कडक निर्बंध, गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे नवनवे उपाय लक्षात घेऊन आपण बॅलन्स साधला पाहिजे, अशी गुलेरिया यांची सूचना आहे.
कोरोनाचं हे संकट नेमकं कधी संपणार हा प्रश्न सगळ्या जगाला पडला आहे. याबाबत अनेक नवे दावेही समोर येतात. काही दिवसांपूर्वी सिंगापूर युनिव्हर्सिटीच्या दाव्याचीही खूप चर्चा झाली होती. त्यांनी असं म्हटलं की मे महिन्यापर्यंत भारतात कोरोनाचा प्रभाव कमी होईल. पण हा दावा मॅथेमॅटिकल मॉड्युलवर अवलंबून होता. डॉ. गुलेरिया हे भारताच्या सर्वात प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थेत काम करतात. त्यांना आपल्याा वैद्यकीय यंत्रणेची चांगली माहिती आहे, हे लक्षात घेऊन त्यांचं वक्तव्य आपण अधिक गांभीर्यानं घ्यायला हवं.
Raj Thackeray | लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लॅन काय? : राज ठाकरे