Jammu Kashmir : निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांना मतदानाचा अधिकार
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीर राज्यात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतियांनादेखील मतदानाचा अधिकार मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे याची घोषणा केली.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये या वर्षी विधानसभेच्या निवडणूका (Jammu Kashmir Assembly Election) होण्याची दाट शक्यता आहे. या आधी निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वास्तव्यास असणारे बिगर काश्मिरी नागरिकदेखील आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकतात. यासाठी त्यांना अधिवासाचा पुरावा देण्याची गरज नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर निवडणूक आयोगाचे (Jammu Kashmir Election Commission) मुख्य अधिकारी हृदेश कुमार यांनी ही माहिती दिली. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेसाठी तैनात असलेले सुरक्षा दलाचे जवानदेखील मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करू शकतील. निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपला निवडणुकीत मदत करण्यासाठी घेण्यात आला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
जम्मू-काश्मीचे मुख्य निवडणूक अधिकारी हृदेश कुमार यांनी बुधवारी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये यंदा 25 लाख नवीन मतदारांचे नाव यादीत समाविष्ट होण्याची अपेक्षा आहे. काश्मीरमध्ये वास्तव्यास असणारे बिगर काश्मिरी कर्मचारी, विद्यार्थी, कामगार हे आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करू शकतात. मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी स्थानिक निवासाचा पुरावा प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्याशिवाय, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेले जवानही आपले नाव मतदार यादीत नाव नोंदवू शकतात.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द केल्यानंतर राज्यात निवडणुका होणार असून त्यासाठी मतदार यादी तयार केल्या जात आहेत. त्यामुळे मतदार यादीत मोठे बदल होणार आहेत. त्याशिवाय, तीन वर्षात 18 वर्ष पूर्ण केलेल्या युवकांची संख्यादेखील वाढली आहे.
राज्यात 76 लाख मतदार
जम्मू-काश्मीरमध्ये 15 सप्टेंबरपासून मतदार यादीत नावांचा समावेश करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया 25 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार. तर, 10 नोव्हेंबरपर्यंत हरकती, आक्षेपांवरील सुनावणी पूर्ण केली होईल. जम्मू-काश्मीरमध्ये 18 वर्षाहून अधिक वयाचे जवळपास 98 लाख युवक आहेत. तर, सध्याच्या मतदार यादीनुसार, एकूण मतदारांची संख्या 76 लाख आहे.
पीडीपीची टीका
पीडीपी पक्षाच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी या प्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जम्मू-काश्मीरमधील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय हा भाजपच्या फायद्यासाठी होता. आता, स्थानिकांशिवाय इतरांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचा निर्णय हा निवडणूक निकालांवर परिणाम करण्यासाठी घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: