Stunt Video: अजय देवगण स्टाईलमध्ये व्हिडीओ करणं तरुणाला महागात, गाड्या जप्त करुन कोठडीत रवानगी
Noida Stunt Video: दोन फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर उभं राहून अभिनेता अजय देवगण स्टाईलमध्ये स्टंट करणं तरुणाला महागात पडलं आहे. पोलिसांनी दोन्ही कारसह बाईक ताब्यात घेऊन त्याची रवानगी कोठडीत केली
Noida Stunt Video: नोएडा : नोएडामध्ये एका तरुणाला रस्त्यावर स्टंट करणे महागात पडलं आहे. नोएडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं. दोन फॉर्च्युनर कारच्या बोनेटवर उभं राहून हा तरुण अभिनेता अजय देवगणच्या स्टाईलमध्ये स्टंटबाजी करत होता. यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. यानंतर सेक्टर-113 पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी ही कारवाई केली.
राजीव पुत्र राजेंद्र असं या तरुणाचं नाव असून तो 21 वर्षांचा आहे. तो गौतमबुद्ध नगर इथल्या सोरखा गावात राहतो. पोलिसांची स्टंटबाजी करणाऱ्या तरुणासह वाहनं देखील जप्त केली. यासोबतच आरोपीचा व्हिडीओही ट्विटरवर जारी करण्यात आला आहे.
दोन एसयूव्ही आणि एक बाईक जप्त
सेक्टर-113 पोलीस स्टेशनचे प्रभारी शरद कांत म्हणाले की, "व्हिडीओच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्याची ओळख राजीव असे असून तो सोरखा गावचा रहिवासी आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन एसयूव्ही आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे."
गाड़ियों व बाइक पर खतरनाक स्टंट करने वाले युवक को थाना सेक्टर-113 नोएडा पुलिस द्वारा गिरफ्तार कर स्टंट में प्रयुक्त वाहनों को सीज किया गया।#UPPolice pic.twitter.com/92yYu33O45
— POLICE COMMISSIONERATE GAUTAM BUDDH NAGAR (@noidapolice) May 22, 2022
सोशल मीडियासाठी व्हिडीओ
शरद कांता पुढे म्हणाले की, "स्टंट करताना वापरण्यात आलेल्या वाहनांमध्ये टोयोटा फॉर्च्युनर आणि राजीवची मोटारसायकल आहे. व्हिडीओसाठी त्याने नातेवाईकाकडून दुसरी फॉर्च्युनर कार घेतली होती. हा तरुण कोणतंही काम करत नाही, परंतु तो चांगल्या कुटुंबातील आहे. तो सोशल मीडियासाठी व्हिडीओ बनवत होता. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
पोलीस आयुक्तांचा सल्ला
दरम्यान, गौतम बुद्ध नगरचे पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी स्थानिक पोलिसांच्या तत्पर कारवाईचं कौतुक केलं. सोबतच मुलं आणि तरुणांच्या आई-वडील आणि पालकांना त्यांच्यावर लक्ष देण्याचं आवाहन केलं. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि शॉर्ट क्लिप समोर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी हा सल्ला दिला आहे, ज्यामध्ये तरुण मुलं-मुली स्टंट करताना दिसत आहेत.
असे व्हिडीओ सातत्याने समोर
विशेष म्हणजे, काही दिवसांपासून नोएडाच्या रस्त्यावर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. स्टंटमन कधी सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे फिरवताना दिसतात, तर कधी कारवर उभं राहून अजय देवगण स्टाईलमध्ये स्टंट करतात. अशातच राजीव नावाच्या या तरुणाचे दोन स्टंट व्हिडीओ शनिवारपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.