नो जीन्स, नो टी-शर्ट; सुबोध जयस्वाल यांनी सूत्रे हाती घेताच CBI मध्ये नवा ड्रेस कोड लागू
Dress code in CBI office : सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांनी सीबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड सक्तीचा केला आहे.
नवी दिल्ली : सीबीआय कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. सीबीआयच्या कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश सीबीआयचे नवीन संचालक सुबोध जयस्वाल यांनी जाहीर केले आहेत. त्यानुसार पुरुषांना जीन्स, टी-शर्ट घालण्यास बंदी आणली असून महिलांनीही साडी वा फॉर्मल कपड्यांत येणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
सुबोध जयस्वाल यांनी सीबीआयची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीबीआयमध्ये नवा ड्रेस कोड लागू केला आहे. त्यानुसार पुरुषांनी आता जीन्स, टी-शर्ट, चप्पल, स्पोर्ट शूज घालून ऑफिसला यायचं नाही असा नियम करण्यात आला आहे. पुरुषांसाठी कॉलर शर्ट, फॉर्मल ट्राउझर्स, फॉर्मल शूज हा ड्रेस कोड बंधनकारक आहे. स्त्रियांसाठी साडी, सूट, फॉर्मल शर्ट आणि ट्राउझर्स असा ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. सीबीआयच्या कामामध्ये व्यावसायिकता दिसावी आणि तिची प्रतिमा अधिक चांगली व्हावी यासाठी हा बदल केल्याचं म्हटलं आहे.
याआधी सीबीआयमध्ये ड्रेस कोड लागू झाला होता तेव्हादेखील महाराष्ट्र कॅडरचे एमजी कात्रे हे संचालक होते. एमजी कात्रे हे सीबीआयचे 1985 ते 1989 या काळात संचालक होते.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुबोधकुमार जयस्वाल दोन वर्षे सीबीआय संचालकपदाची धुरा सांभाळतील.
जयस्वाल हे नऊ वर्षे भारताच्या बाह्य इंटेलिजेंस एजन्सीच्या रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (आरए अँडडब्ल्यू) कडे होते, त्या काळात त्यांनी आरए अँडडब्ल्यूचे अतिरिक्त सचिव म्हणून तीन वर्षे काम पाहिले. पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनेलने सीबीआय प्रमुख पद सुबोध कुमार जयस्वाल यांच्याकडे सोपवलं आहे.
महत्वाच्या बातम्या :