No Confidence Motion : अविश्वास प्रस्तावावर 8 आणि 9 ऑगस्टला चर्चा होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी संसदेत देणार उत्तर
No Confidence Motion: मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येऊन उत्तर देण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.
Parliament Monsoon Session 2023 : विरोधी पक्षाकडून मांडण्यात आलेल्या अविश्वासाच्या प्रस्तावावर पुढील आठवड्यात संसदेत (Parliament) चर्चा होणार आहे. पुढील आठवड्यातील 8 ऑगस्ट रोजी प्रश्न उत्तराच्या सत्रानंतर चर्चा होणार आहे. तर 9 ऑगस्ट रोजी देखील या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. तर 10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे संसदेत विरोधकांना (Opposition) उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मणिपूरच्या मुद्द्यावर अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी देखील मंजुरी दिली होती.
संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधकांनी मणिपूरच्या (Manipur) मु्द्द्यावर सरकारला घेरलं आहे. याच मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेत घमासान सुरु आहे. तसेच विरोधकांनी संसदेच्या परिसरात या मुद्द्यावरुन आंदोलन देखील केलं आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक दोन्हीही चर्चा करण्यास तयार आहेत. मात्र सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या मुद्द्यावर बोलणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य करावं अशी मागणी करण्यात येत होती. तर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 ऑगस्ट रोजी संसदेत येऊन या मुद्द्यावर भाष्य करणार आहेत.
विरोधकांचं शिष्टमंडळ मणिपूरमध्ये
दरम्यान विरोधी पक्षांची एकजूट असलेल्या इंडियामधील नेत्याचं एक शिष्टमंडळ मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी मणिपूरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ 29 आणि 30 जुलै रोजी मणिपूरच्या दौऱ्यावर गेले होते. तर विरोधकांना मणिपूरच्या मुद्द्यावर बोलू देत नसल्याचा दावा देखील केला आहे. त्यामुळे विरोधकांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध केला होता.
तर राज्यसभेत देखील मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी 176 नुसार नोटीस बजावण्यात आली आहे. तर सरकार या मुद्द्यावर बोलायला तयार असून विरोधक या मुद्यावर तयार आहेत का असा प्रश्न सभापतींनी विचारला. पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या बाहेर माध्यमांशी संवाद साधताना मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. पण त्यांनी संसदेतच या मुद्द्यावर बोलवं अशी मागणी विरोधकांकडून जोर धरत आहे.
त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांच्या आरोपांवर भाष्य करुन त्यांना चोख उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच विरोधकांकडून मांडण्यात आलेला अविश्वास प्रस्तावाचे संसदेत काय पडसाद उमटणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. आता संसदेत या मुद्द्यावर होणाऱ्या चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागू राहिलं आहे.