Nitin Gadkari : कारचा खर्च अर्ध्यावर येणार! नितीन गडकरींनी सांगितला सुपर फॉर्म्युला
Nitin Gadkari On Ethanol Car : एक लिटर इथेनॉलची किंमत 60 रुपये आहे, तर पेट्रोलचा दर 120 रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यामुळे इथेनॉलचा वापर केल्यास प्रवास खर्च अर्ध्यावर येईल असं नितीन गडकरी म्हणाले.
नवी दिल्ली : पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलचा विचार केला तर प्रवासाचा खर्च अर्ध्यावर येईल, कारचा खर्च अर्ध्यावर येईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या काळात जास्तीत जास्त वाहने ही इथेनॉलवर चालतील यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी आवाहन केलं.
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी ABP Live India Infrastructure Conclave 2025 च्या दुसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी अल्टरनेट फ्यूएल म्हणजे पर्यायी इंधनाचाही उल्लेख केला. सोबतच गडकरींनी आपल्या कारबद्दल माहिती सांगितली.
पर्यायी इंधनाबद्दल काय म्हणाले?
पर्यायी इंधनाबाबत नितीन गडकरी म्हणाले की, त्यात जे काही इंधन उपलब्ध आहे ते अत्यंत स्वस्त आहे. इलेक्ट्रिक एनर्जी पर्यायही स्वस्त आहे. त्याचे शुल्क प्रति युनिट 2 रुपये 80 पैसे आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसचा खर्च प्रति किलोमीटर 115 रुपये इतका आहे. तर एसीशिवाय चालणाऱ्या इलेक्ट्रिक बसचा खर्च 39 रुपये प्रति किमी आहे.एसी बसचा खर्च 41 रुपये प्रति किमी आहे. परंतु ही किंमत सबसिडी दिल्यानंतर आहे. त्याचा मूळचा खर्च हा 61 रुपये प्रति किमी इतकी आहे.
नितीन गडकरींच्या कारचा संदर्भ
नितीन गडकरी यांनी आपल्या कारचा संदर्भ देत सांगितले की, माझी कार इथेनॉलवर चालते. जर तुम्ही या कारची पेट्रोलशी तुलना केली तर तिचा खर्च हा 25 रुपये प्रति किलोमीटर इतका आहे. एक लिटर इथेनॉलची किंमत 60 रुपये आहे, तर पेट्रोलचा दर 120 रुपयांच्या वर आहे.
याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकांना जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहेत. यासाठी किंमतीवर आणि जीएसटीवर सूट यासारख्या गोष्टींवर अधिक भर देत आहेत. आता कंपन्या नवीन कार खरेदीवर 1.5 टक्के ते 3.5 टक्के सूट देत आहेत. परंतु ही सवलत तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही तुमची जुनी कार स्क्रॅप कराल. लक्झरी कार बनवणाऱ्या काही कंपन्या तर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत.