(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nirmala Sitharaman On Inflation : लोकसभेसह राज्यसभेतही महागाईच्या मुद्यावर चर्चा, अर्थमंत्री सीतारमण यांची विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं
सोमवारी लोकसभेत आणि मंगळवारी राज्यसभेत महागाईच्या मुद्यावर तब्बल सहा तास चर्चा झाली. विरोधकांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना यावेळी अर्थमंत्री सीतारमन यांनी उत्तरं दिली.
Nirmala Sitharaman in Parliament : सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन (Parliament monsoon session) सुरु आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधी पक्ष महागाईच्या (Inflation) मुद्यावर सभागृहात चर्चे करण्याच्या मागणीवर ठाम होते. विरोधकांनी केलेल्या गदारोळामळं गेल्या दोन आठवड्यात अनेक वेळा लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज जवळपास ठप्पच झाले होते. सभागृहाच्या आत आणि बाहेर विरोधकांनी निदर्शने केली होती. दरम्यान, सोमवारी लोकसभेत आणि मंगळवारी राज्यसभेत महागाईच्या मुद्यावर तब्बल सहा तास चर्चा झाली. राज्यसभेतील चर्चेदरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्षांनी वाढत्या महागाईसाठी सरकारला जबाबदार धरले. दोन्ही सभागृहात चर्चा झाल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी चर्चेला उत्तर दिले.
सभागृहात विरोधकांच्या प्रश्नांन उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांमुळेच कोरोनाच्या काळात मंदी असूनही भारताची स्थिती चांगली राहिली आहे. जागतिक मंदीच्या काळात अनेक देश मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. तसेच अनेक देश मंदीच्या गर्तेत जाणण्याच्या मार्गावर आहेत. अशा स्थितीत भारत या मंदीच्या बाहेर आहे. रुपयाच्या सततच्या घसरणीवर देखील अर्थमंत्री सीतारमण यांनी उत्तर दिले. सध्या रुपया चांगल्या स्थितीत असल्याची माहिती त्यांनी दिली.
उज्ज्वला योजनेबाबत विरोधकांच्या आरोपांमध्ये तथ्य नाही
उज्ज्वला योजनेबाबत विरोधकांनी केलेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याची माहिती यावेळी अर्थमंत्र्यांनी दिली. उज्ज्वला योजनेबाबत म्हटल्याप्रमाणं, गॅसची किंमत आपल्या हातात नाही. तरीही आम्ही 35 कोटी जनतेला दिलेले वचन पाळले आहे. एलपीजी कव्हरेज 69 टक्क्यांवरून 100 टक्क्यांहून अधिक झाले आहे.
जीएसटीबाबत अर्थमंत्री सीतारमण काय म्हणाल्या?
आता जास्त महसूल मिळत आहे. तो नऊ टक्क्यांवरून 14 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आत्तापर्यंत 3.77 लाख कोटी रुपये GST अंतर्गत आले आहेत. तर राज्यांना 3.93 लाख कोटी रुपये देण्यात आले असल्याची माहिती अर्थमंत्री सीतारमण यांनी दिली. राज्यसभेत चलनवाढीवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पूर्वी 229 वस्तूंवर 28 टक्के GST लागू होत असे, पण आता GST च्या या दरात फक्त 28 वस्तू उरल्या आहेत. GST बाबतचा संभ्रम दूर झाला पाहिजे, कारण आम्ही रुग्णालयातील उपचारांवर जीएसटी वाढवला हे चुकीचे आहे. त्याऐवजी, रुग्णालयातील खाटांचा संबंध आहे. आयसीयू आणि आपत्कालीन स्थितीवर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती सितारमण यांनी दिली. हॉस्पिटलमध्ये तुम्ही जर पाच हजार किंवा त्यापेक्षा जास्त दरानं रुम घेत असाल तर त्यावर जीएसटी लावण्यात आला असल्याची माहिती सीतारमण यांनी दिली आहे. अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या वस्तूंवर जीएसटी लावण्यात आला आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. स्मशानभूमी, दफन इत्यादींच्या साहित्यावर जीएसटी लावला नसल्याचीमाहितीही त्यांनी दिली. त्यामुळं सर्वसामान्यांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्या म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी दूध दही, लस्सी, पीठ, डाळ यासारख्या वस्तूंवर जीएसटी लावल्याबद्दल सरकारवर टीका केली होती. यावर अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलमध्ये प्रत्येक राज्यातील सदस्य असतात आणि सर्वजण मिळून निर्णय घेतात. या गोष्टींवर जीएसटी वाढवावा, यावर सर्व सदस्यांनी एकमत केले होते. मग कोणत्याही एका राज्याच्या प्रतिनिधीने विरोधही केला नाही. तरीही किरकोळ विक्रेत्यांना दूध दही इत्यादींवर जीएसटी भरावा लागत नाही. पण ज्या कंपन्यांनी या गोष्टी मोठ्या प्रमाणावर विकण्यासाठी स्वत:चे ब्रँड बनवले आहेत, त्यांच्यावर जीएसटी लावण्यात आला असल्याची माहिती सितारमण यांनी दिली आहे. जीएसटीपूर्वीही डाळी, रवा, बेसन आदींवर व्हॅट आकारला जात होता.
महत्त्वाच्या बातम्या: