कर्जबुडव्या निरव मोदीच्या मुंबईतील HCL हाऊसचा 23 सप्टेंबरला लिलाव, कर्जवसुली लवादाचा आदेश
Nirav Modi : निरव मोदींच्या मरोल येथील एचसीएल हाऊसचा लिलाव 23 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. किमान 52 कोटीपासून पुढे याचा लिलाव सुरू होणार आहे.
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत 13 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेल्या हिरा व्यापारी नीरव मोदी यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे आदेश कर्जवसुली लवादाने (Debt Recovery Tribunal-I (DRT-I) दिले आहेत. मोदीकडून पैसे वसूल करण्यासाठी एचसीएल हाऊसचा लिलाव करण्याचे दिले आहेत. या एचसीएल हाऊसची किंमत 2,133 कोटींपेक्षा जास्त आहे.
मुंबई डीआरटी-आयने दिलेल्या आदेशानुसार, मरोल येथील एचसीएल हाऊसचा लिलाव 23 सप्टेंबरला करण्यात येणार आहे. किमान 52 कोटीपासून पुढे याचा लिलाव सुरू होणार आहे. पंजाब नॅशनल बँक आणि 15 अन्य बँकांकडे जवळपास पाच वर्षांची मोठी थकबाकी आहे.
वसुली अधिकारी अजित त्रिपाठी यांनी 11 ऑगस्टला दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, संबंधित लिलावाची घोषणा ही ही आयकर अधिनयम, 1961 च्या दुसऱ्या अनुसूचीमधील नियम 38, 52 (2) आणि बँक आणि वित्तीय संस्था, 1993 या नुसार करण्यात आली आहे. हे प्रकरण पीएनबी प्लस 15 सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका विरुद्ध नीरव मोदीची समूह कंपनी असणाऱ्या फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड आणि इतर ज्ञात किंवा नवीन संस्थांशी संबंधित आहे ज्यांच्याकडून थकबाकी वसूल करण्यायोग्य आहे.
पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीनंतर केंद्रीय तपास यंत्रणेने जानेवारी 2018 मध्ये पहिला गुन्हा दाखल केला. त्यानंतर ईडी, आयकर विभाग आणि इतर तपास यंत्रणांनी मोदी, मेहुल चोक्सी आणि बँकेचे अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. फायरस्टार इंटरनॅशनल लिमिटेड या समुहामध्ये फायरस्टोन ट्रेडिंग प्रा. लिमिचेड, एएननएम प्रा. लिमिटेड, एनडीएम एंटरप्रायजेस याशिवाय नीशल ट्रेडिंग अशा अनेक कंपन्याचा समावेश आहे.
ईडीकडून चोक्सीच्या मालमत्तेवर टाच
ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली आहे. मेहुल चोकसीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्ता ईडीने जप्त केल्या. या मालमत्तांमध्ये 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधलं ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधलं फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनही जप्त करण्यात आली. त्याशिवाय, ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्स गोठवले आहेत.