New Year 2021 Restrictions : जल्लोषावर निर्बंध, मुंबई, दिल्लीत नाईट कर्फ्यू, देशातील प्रमुख शहरांमध्ये काय स्थिती?
New Year 2021 Restrictions : नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषावर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. दिल्लीमध्ये देखील नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेश राज्य सरकारांनी देखील जल्लोषावर निर्बंध घातले आहेत.
मुंबई : आज वर्ष 2020 चा शेवटचा दिवस आहे. कोरोना महामारीनं संकटात गेलेल्या या वर्षाच्या समाप्तीचा जल्लोष करण्यासाठी नागरिक रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्याची शक्यता आहे. मात्र कोरोनामुळं या जल्लोषावर विरजन पडणार आहे. केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना नवीन वर्षाच्या या स्वागताच्या जल्लोषावर आणि गर्दीवर नियंत्रणासंदर्भात कडक निर्बंध घालण्याबाबत निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. तर मुंबईतील गार्डन आणि रस्त्यावरही गर्दी करण्यास मनाई घालण्यात आली आहे. दिल्लीमध्ये देखील नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार, मध्य प्रदेश राज्य सरकारांनी देखील नवीन वर्षाच्या जल्लोषावर निर्बंध घातले आहेत.
मुंबईत ड्रिंक अँड ड्राईव्ह केसमध्ये ब्लड टेस्ट, सहप्रवाशांविरुद्धही कारवाई आज 20 व्या शतकाचा शेवटचा दिवस आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, जुहू बीच आणि समुद्र किनाऱ्यांवर गर्दी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई वाहतूक पोलिसांकडून 31 डिसेंबरच्या रात्रीसाठी परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. तर मुंबईतील गार्डन आणि रस्त्यावरही गर्दी करण्यास मनाई घालण्यात आली आहे. दरवर्षी ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये ब्रीथ अॅनालायझरने मद्यपान केलं आहे की नाही याची चाचणी केली जात होती. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्लड टेस्ट करून चालकाने मद्यपान सेवन केलं आलं आहे की नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. यंदा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही घरा बाहेर पडत असाल आणि मद्यपान करून गाडी चालवत असाल तर फक्त तुमच्यावरच नाही तर गाडीत तुमच्यासोबत असलेल्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता मद्यपानाचे सेवन करून गाडी चालवणाऱ्यांची रक्त चाचणी केली जाणार आहे आणि जर त्यांनी मद्यपानाचे सेवन केलं असेल तर त्यांच्यावर मोटर व्हेईकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसेच गाडीत असणाऱ्या सहप्रवाशांविरुद्ध सुद्धा पेंडमिक अॅक्टनुसार कारवाई केली जाईल.
नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सरकारची नियमावली
20 व्या शतकाला निरोप देताना जल्लोष करण्यासाठी सरकारकडून काही अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत संचार बंदी लागु करण्यात आली आहे. गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन, गिरगाव चौपाटी सरख्या सार्वजनिक ठिकाणी गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्री 1 वाजल्यानंतर जेवण पार्सल सुद्धा मिळणार नाही.
महाबळेश्वर, पाचगणीत निर्बंध महाबळेश्वर पाचगणीच्या पर्यटकांवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी चाप घातला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरात रात्री पर्यटकांना दहा नंतर बाहेर फिरता येणार नाही. कोणता कार्यक्रम करता येणार नाही. पार्टी करता येणार नाही त्यामुळे 31 डिसेंबरसाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा फटका बसणार आहे.
वसई विरार, मिरा भाईंदरमध्ये पोलीस प्रशासन सज्ज 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वसई विरार आणि मिरा भाईंदरमध्ये पहाटेपासूनच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर नाकाबंदी सुरू केली असून शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार ही नाकाबंदी सुरू आहे. वसई विरार तसेच भाईंदरमधील उत्तन येथे समुद्र किनारे, हॉटेल्स, रिसॉर्ट वर मुंबई, ठाणे, सह आजूबाजूच्या परिसरातून शेकडो नागरिक येत असतात. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करताना कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. प्रत्येक झोन प्रमाणे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे.
दिल्लीत नाईट कर्फ्यू दिल्लीमध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीच्या रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने जल्लोष करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक जागांवर पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे.
बंगळुरु, गोव्यातही निर्बंध, कोलकात्यात बंदी नाही कर्नाटक सरकारने राज्याची राजधानी बंगळुरुमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री आणि 1 जानेवारीच्या सकाळी पार्ट्यांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. तर गोव्यात देखील काहीसे निर्बंध घालण्यात आले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक आले आहेत. भोपाळमध्ये देखील रात्रीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तर इंदोरमध्ये 21 वर्ष वयाच्या आतील मुलांना दारु न देण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानमधील सर्व प्रमुख शहरात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तिकडे बिहारच्या पाटण्यात मात्र वेगळ्या गाई़डलाईन्स नवीन वर्षासाठी घातलेल्या नाहीत. मात्र 200 हून अधिक लोकांना एकत्रित येण्याला बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारने नवीन वर्षाच्या कार्यक्रमात 100 पेक्षा अधिक लोकांच्या सहभागावर बंदी घातली आहे. मात्र या कार्यक्रमात कोरोनाबाबतीत सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. तिकडे कोलकात्यामध्ये जल्लोषावर कुठलेही निर्बंध नाहीत. मात्र कोविडचे प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.