Wrestlers Protest: "देशातील खेळाडूंना न्याय मिळावा..."; कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचं ट्वीट
Neeraj Chopra: भारतीय कुस्तीपटूंना आता खेळाडूंचाही पाठिंबा मिळत आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना न्याय देण्याची मागणी करत आता ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रानं ट्वीट केलं आहे.
Neeraj Chopra Support Wrestlers: भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) विरुद्ध कुस्तीपटूंच्या संपाचा शुक्रवारी (28 एप्रिल) पाचवा दिवस आहे. आता अनेक राजकारणी पैलवानांच्या समर्थनार्थ पुढे येऊ लागले आहेत. दरम्यान, आता कुस्तीपटूंना ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राचीही (Neeraj Chopra) साथ मिळाली आहे. नीरज चोप्रानं ट्वीट करत कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. नीरजनं ट्वीट केलं आहे की, "ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना लवकरात लवकर न्याय मिळायला हवा. आमच्या खेळाडूंना रस्त्यावर उतरून न्यायाची मागणी करताना पाहून मला वेदना होत आहेत. त्यांनी आमच्या महान राष्ट्राचं प्रतिनिधित्व करून आम्हाला अभिमान वाटावा यासाठी खूप चांगलं काम केलं आहे."
नीरज चोप्रानं ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "एक राष्ट्र म्हणून प्रत्येक माणसाची अखंडता आणि प्रतिष्ठेचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. जे घडत आहे ते कधीच घडू नये. हा एक संवेदनशील मुद्दा आहे आणि तो निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीनं हाताळला गेला पाहिजे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीनं कार्यवाही करून न्याय मिळवून द्यावा."
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) April 28, 2023
क्रिकेटपटूंची साथ न मिळाल्यानं विनेश फोगाट भावूक
गुरुवारी (27 एप्रिल) विनेश फोगट खूपच भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय क्रिकेटपटू आणि इतर आघाडीचे खेळाडू कुस्तीपटूंच्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत मौन बाळगून आहेत, यावर तिनं प्रश्न उपस्थित केले. 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' चळवळीचं उदाहरणही यावेळी विनेशनं दिलं. उदाहरण देताना ती म्हणाली की, आपल्या देशात महान खेळाडू नाहीत असं नाही. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी अमेरिकेतील ब्लॅक लाइव्ह्स मॅटर चळवळीला पाठिंबा दर्शवला होता. आमची एवढीही लायकी नाही का? पुढे बोलताना ती म्हणाली की, जेव्हा कुस्तीपटू जिंकतात, तेव्हा सर्व क्रिकेटपटू त्यांचं अभिनंदन करण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी ट्वीटही करतात, मग आता काय झालं? फोगाटनं पुढे बोलताना विचारलं की, या खेळाडूंना व्यवस्थेची इतकी भीती वाटते की हो, काही तरी गडबड सुरू आहे?
पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील : विनेश फोगाट
पीटी उषा म्हणाल्या होत्या की, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) कडे लैंगिक छळाच्या तक्रारींसाठी एक समिती आहे. रस्त्यावर उतरण्याऐवजी ते (आंदोलक पैलवान/कुस्तीपटू) आधी आमच्याकडे येऊ शकले असते, पण ते आयओएमध्ये आलेच नाहीत. केवळ कुस्तीपटूंसाठीच नाही तर खेळासाठीही ते चांगलं नाही. त्यांनी थोडी शिस्तही बाळगली पाहिजे. पैलवानांच्या निषेधामुळे देशाची प्रतिमा मलीन होत असल्याचंही पीटी उषा बोलताना म्हणाल्या होत्या.
याशिवाय विनेशनं पीटी उषा यांचं वक्तव्य असंवेदनशील असल्याचं म्हटलं आहे. आपण संविधानानुसार जगतो आणि स्वतंत्र नागरिक आहोत, असं विनेश म्हणाली. आपण कुठेही जाऊ शकतो, आम्ही बाहेर रस्त्यावर बसलो आहोत तर काहीतरी कारण असेलंच ना? आमचं कोणी ऐकलं नाही, यामागेही काहीतरी कारण असावं, मग ते आयओए असो वा क्रीडा मंत्रालय. फोगट म्हणाली की, तिनं पीटी उषा यांना फोनही केला होता, पण त्यांनी फोनही उचलला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Wrestlers Protest: "आमची तेवढीही लायकी नाही?"; क्रिकेटर्सचा सपोर्ट न मिळाल्यामुळे विनेश फोगाट भावूक