देशाची सुरक्षा तीन मित्रांच्या हाती; लष्कर, हवाई आणि नौदल प्रमुख बॅचमेट्स
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नव्या वर्षात नवे लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. लष्करप्रमुख मनोज नरवणे, हवाई दलप्रमुख राकेशकुमार सिंह भदौरिया, नौदल प्रमुख करमबीर सिंह हे तिघेही एनडीएचे बॅचमेट्स आहेत.
मुंबई : देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आता तीन मित्रांच्या खांद्यावर असणार आहे. नॅशनल डिफेंस अॅकॅडमीत 1976 मध्ये बॅचमेट्स असणारे मनोज मुकुंद नरवणे, राकेश कुमार सिंह भदौरिया, करमबीर सिंह आज अनुक्रमे लष्कर, हवाईदल आणि नौदल प्रमुख आहेत. 44 वर्षांनंतर तिघेही आज सर्वोच्च पदांवर पोहोचले आहेत. या तिघांमध्ये आणखी एक समानता आहे. ती म्हणजे तिघांचे वडील भारतीय हवाई दलात होते.
अॅडमिरल करमबीर सिंह यांची यावर्षी देशाचे 24 वे नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर एअर चीफ मार्शल राकेशकुमार सिंह भदौरिया यांचीही याचवर्षी 26 वे हवाई दलप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज मुकुंद नरवणे, राकेश कुमार सिंह भदौरिया, करमबीर सिंह एनडीए कॅडेटचा कोर्स पूर्ण करुन 1980 मध्ये आपल्या सर्व्हिस अॅकॅडमीत अधिकारी म्हणून सेवेते रुजू झाले होते. फार कमी वेळा असं झालं आहे की एनडीएमध्ये एकत्र असलेले अधिकारी एकाचवेळी प्रमुख पदावर पोहोचले.
लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे नव्या वर्षात लष्करप्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. नरवणे हे देशाचे 28 वे लष्कर प्रमुख असतील. सध्याचे लष्करप्रमुख बिपीन रावत 31 डिसेंबरला सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून मनोज नरवणे कार्यभार स्वीकारणार आहेत. नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर 2019 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते देशाचे नवे लष्करप्रमुख असतील असंही त्यावेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. सेवा ज्येष्ठतेनुसार मनोज नरवणे यांची निवड करण्यात आली आहे.
मनोज नरवणे यांचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी पुण्यातील ज्ञानप्रबोधीनी शाळेतून घेतलं. चित्रकलेची आवड जोपासत असतानाच त्यांना लष्करी सेवेचे वेध लागले. पुण्यातील एनडीएमधून त्यांनी लष्कराचे शिक्षण घेतल्यानंतर 1980 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. शीख लाईट इन्फंट्रीमध्ये सुरुवातीला त्यांनी काम केले. बिपीन रावत हे सुद्धा याच रेजिमेंटचे जवान आहेत. मनोज नरवणे यांच्या रुपाने जवळपास 33 वर्षानंतर मराठी माणसाकडे पुन्हा एकदा लष्कराचे नेतृत्व आले आहे. 13 लाख अधिकाऱ्यांचा फौजफाटा असणाऱ्या लष्कराचे प्रमुख म्हणून आता लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे काम पाहणार आहेत.