Sharad Pawar : निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आधीच शरद पवारांना धक्का; पाठिंबा देणाऱ्या खासदाराची संख्या घटली
NCP Sharad Pawar : निवडणूक आयोगासमोरील सुनावणी आधीच शरद पवारांना धक्का बसला आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्या खासदाराची संख्या एकने कमी झाली आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि निवडणूक चिन्ह कोणाचे हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Election Commission) गेला असताना दुसरीकडे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना आणखी धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल (Mohammed Faizal) लोकसभेतून पुन्हा अपात्र (Mohammed Faizal Disqualified from Lok Sabha) झाले आहेत. एकाच वर्षात दोन वेळा अपात्र ठरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केरळ हायकोर्टाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्याने लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभा सचिवालयाने फैजल यांच्यावर केलेल्या कारवाईमुळे निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीची लढाई सुरू होण्याआधी खासदारांच्या संख्येमध्ये शरद पवार गटाला आणखी एक धक्का बसला आहे. मोहम्मद फैसल यांना 2009 मधल्या एका राजकीय खूनाच्या प्रकरणात दहा वर्षांची शिक्षा झाली आहे. आधी सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती त्यावर हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली होती. नंतर या प्रकरणात पीडितांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवलं होतं.
आधी सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली होती त्यावर हायकोर्टाने तात्पुरती स्थगिती दिली होती. नंतर या प्रकरणात पीडितांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण हायकोर्टाकडे पाठवलं होतं.
10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा
लक्षद्वीपच्या एका न्यायालयाने बुधवारी लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल यांच्यासह चार जणांना हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. कावरत्ती येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 2009 मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोषींना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.
कोण आहेत खासदार मोहम्मद फैजल
मोहम्मद फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. मोहम्मद फैजल हे 2014 मध्ये लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातून लोकसभा खासदार म्हणून 16 व्या लोकसभेवर पहिल्यांदा निवडून आले होते. 2014-2016 या कालावधीत ते परिवहन, पर्यटन आणि संस्कृतीविषयक स्थायी समिती आणि गृह मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य होते.
मोहम्मद फैजल 2019 मधील लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून पुन्हा निवडून आले. खासदार फैजल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्राबाहेरील एकमेव खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर फैजल यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला.