LNG मुळे क्रुड आईल आयात खर्चात कपात, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार: नितीन गडकरी
क्रुड आईलमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर भार पडतोच पण त्यामुळे प्रदूषणाची समस्याही वाढते. त्यामुळे LNG हा येत्या काळात चांगला पर्याय ठरु शकेल अशी आशा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली.
नागपूर : देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा (LNG) वापर केल्यास या आयात खर्चामध्ये कपात होईल आणि त्याचा फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले. देशातील पहिल्या LNG फिलिंग स्टेशनचे उदघाटन आज नागपुरात नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. त्याप्रसंगी ते बोलत होते. औषध क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या बैद्यनाथ समूहाने हे LNG फिलिंग स्टेशन "B-LNG" या नावाने नागपूरच्या आऊटर रिंगरोडवर सुरु केले आहे.
गडकरींनी काही वर्षांपूर्वी 'डिझेल मुक्त विदर्भ' अशी संकल्पना मांडली होती आणि त्याच संकल्पनेच्या अनुषंगाने आज देशातील पहिला एलएनजी फिलिंग स्टेशन नागपुरात सुरु होत आहे. डिझेलपेक्षा बरंच स्वस्त, जास्त मायलेज आणि कमी प्रदूषण करणारे LNG डिझेलला चांगला पर्याय असून ट्रक आणि बसेसमध्ये डिझेल ऐवजी LNG हा चांगला पर्याय ठरणार आहे.
या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "आपला देश दरवर्षी 8 लाख कोटींचे क्रूड ऑइल आयात करतो. या आयातीमुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतो. त्याचं वेळी या इंधनामुळे मोठं प्रदूषण होतं. त्यामुळे एलएनजी आवश्यक पर्याय आहे. एलएनजी इंधनामुळे प्रदूषण कमी होईल. वाहतुकीचा खर्च कमी होऊन नफा वाढेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होईल."
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, "देशातील साखर कारखान्यामधून आवश्यकतेपेक्षा जास्त साखर उत्पादित होत आहे. आपल्याला 240 लाख टन साखरेची गरज असताना उत्पादन हे 305 लाख टन होत आहे. तसेच तांदळाचे उत्पादनही जास्त होतं. त्यामुळे सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित करुन वापरण्याची परवानगी दिली आहे. सध्या 10 टक्के इथेनॉलचे मिश्रण केलं जातं पण पंतप्रधानानी ते मिश्रण 22 टक्के पर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इंधन आयातीचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे."
आम्ही पुढील तीन महिन्यात ऑटोमोबाईल कंपन्याना flex इंजिन ( विविध इंधन वापरता येईल असे इंजिन ) बनवण्यासाठी सांगणार आहोत असंही गडकरींनी सांगितलं. तसं झाले तर वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एकापेक्षा जास्त इंधनने त्यांचे वाहन चालवण्याचे पर्याय उपलब्ध होणार आहेत असंही ते म्हणाले.
सध्या पेट्रोलचे दर वाढत असून नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी आंदोलनही होत आहे. अशा वेळी या उपाययोजनांची अंमलबजावणी केली असता लोकांना दिलासा मिळेल असंही गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Jammu Kashmir : दहशतवाद्यांशी संबध असणाऱ्या 11 सरकारी कर्मचाऱ्यांची गच्छंती; हिजबूल मुजाहिद्दीन प्रमुखाच्या दोन मुलांचा समावेश
- Raj Thackeray: 'निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झालीय,मनसेची भूमिका एकला चलो रे': राज ठाकरे
- Lionel Messi : लिओनेल मेस्सीचं स्वप्न साकार; 28 वर्षांनी कोपा अमेरिका स्पर्धेत अर्जेंटीनाचा विजय