Jammu Kashmir : दहशतवाद्यांशी संबध असणाऱ्या 11 सरकारी कर्मचाऱ्यांची गच्छंती; हिजबूल मुजाहिद्दीन प्रमुखाच्या दोन मुलांचा समावेश
दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका ठेऊन हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाचा प्रमुख असलेल्या सय्यद सलाऊद्दीनच्या दोन मुलांसह 11 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
श्रीनगर : दहशतवाद्यांशी असलेल्या संबंधावरुन आणि टेरर फंडिंगचा ठपका ठेऊन जम्मू काश्मीरमधील 11 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून बरखास्त करण्यात आल आहे. या 11 कर्मचाऱ्यांमध्ये हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाचा प्रमुख असलेल्या सय्यद सलाऊद्दीनच्या दोन मुलांचा समावेश आहे. यापैकी 4 कर्मचारी अनंतनाग, 3 बडगाम तर बारामुल्ला, श्रीनगर, पुलवामा, कुपवाडा या ठिकाणच्या प्रत्येकी एका कर्मचाऱ्याला सरकारी नोकरीतून बरखास्त करण्यात आलं आहे.
बरखास्त करण्यात आलेल्या 11 कर्मचाऱ्यांपैकी 4 कर्मचारी हे शिक्षण विभागाचे, 2 कर्मचारी हे जम्मू-काश्मीर पोलीस आणि बाकी कर्मचारी हे कृषी, कौशल्य विकास, उर्जा तसेच आरोग्य विभागातील आहेत.
दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाने एक चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने संबंधित 11 कर्मचाऱ्यांची बरखास्ती करावी अशी शिफारस केली होती. त्यानुसार प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
संबंधित कर्मचारी हे दहशतवाद्यांच्या संपर्कात होते, त्यांनी दहशतवाद्यांना मदत केली आहे आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणाशीही त्यांचा संबंध आहे असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या सैय्यद सलाऊद्दीनची मुलं असलेल्या सैय्यद अहमद शकील आणि शाहिद युसुफ या दोघांचा टेरर फंडिंगशी संबंधित कारवायांमध्ये हात असल्याचं समोर आल्यानं त्यांना नोकरीतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून एनआयएची या दोघांवर पाळत होती.
हिजबूल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाचा प्रमुख असलेला सय्यद सलाऊद्दीन हा काश्मीरचा असून तो सध्या पाकिव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास आहे. तो युनायटेड जिहाद कौन्सिलचा प्रमुखही आहे. जेश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी गटांनी मिळून पाकव्याप्त काश्मीरमध्ये युनायटेड जिहाद कौन्सिलची स्थापना केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Twitter Grievance Officer : ट्विटरकडून विनय प्रकाश यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्ती
- Survey : तुम्हाला तुमच्या बायकोचा नंबर पाठ आहे का? दहापैकी नऊ पुरुष आपल्या बायकोचा नंबर विसरतात
- Copa America 2021 final : स्पर्धा अमेरिकेत, जल्लोषाचा गुलाल कोल्हापुरात! अर्जेंटिनाच्या विजयानंतर हलगीच्या तालावर कोल्हापूरकरांचा ठेका