Soumya Vishwanathan Father Die : लेकीच्या मारेकऱ्यांना 15 वर्षांनी शिक्षा; बापानं 'न्याय' होताच अवघ्या 15 दिवसांमध्येच डोळे मिटले, पत्रकार सौम्या विश्वनाथन कुटुंबाची शोकांतिका
सौम्या विश्वनाथनच्या (TV journalist Soumya Vishwanathan) हत्येप्रकरणी साकेत न्यायालयाने 25 नोव्हेंबर रोजी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाचवा आरोपी अजय सेठीला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील महिला टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या (TV journalist Soumya Vishwanathan) हत्येप्रकरणी साकेत न्यायालयाने 25 नोव्हेंबर रोजी चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पाचवा आरोपी अजय सेठी याला 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. या घटनेनंतर अवघ्या पंधरा दिवसांध्येच पत्रकार सौम्या विश्वनाथनच्या वडिलांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला आहे.
सौम्या विश्वनाथनची गोळ्या झाडून हत्या
टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथनचे वडील एमके विश्वनाथन (MK Vishwanathan, the father of TV journalist Soumya Vishwanathan) यांचे शनिवारी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या मुलीचा म्हणजेच मयत सौम्याचा 41 वा वाढदिवस असण्याच्या एका दिवसपूर्वीच निधन झाले. हेडलाईन्स टुडे (आता इंडिया टुडे) मध्ये काम करणार्या सौम्या विश्वनाथनची 30 सप्टेंबर 2008 रोजी पहाटे 3.25 ते 3.55 च्या दरम्यान कार्यालयातून घरी जात असताना दक्षिण दिल्लीतील नेल्सन मंडेला रोडवर तिच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिस तपासात दरोड्याचा हेतू निष्पन्न झाला. तिला लुटण्याच्या प्रयत्नात ते तिच्या कारचा पाठलाग करत असताना आरोपींनी सौम्या विश्वनाथनची गोळ्या झाडून हत्या केली होती.
आरोपींना अवघ्या 15 दिवसांपूर्वीच शिक्षा
या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींमध्ये रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार उर्फ अजय यांचा समावेश आहे. न्यायालयाने या चार आरोपी रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक आणि अजय कुमार उर्फ अजय यांना 1.25 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कनिष्ठ न्यायालयाने अजय सेठीला हत्येप्रकरणी दोषी ठरवले नव्हते. न्यायालयाने अजय सेठीला भारतीय दंड संहिता (IPC) कलम 411 अंतर्गत दोषी ठरवले होते. त्यानंतर शनिवारी न्यायालयाने शिक्षा जाहीर करताना या खून प्रकरणातील पाचवा आरोपी अजय सेठी याला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी साकेत न्यायालयाने शुक्रवारी (24 नोव्हेंबर) दोषींना शिक्षा देण्याचा निर्णय राखून ठेवला होता.
हत्येचा उलगडा होण्यासाठी पोलिसांना तब्बल 6 महिने लागले
दरम्यान, सौम्या विश्वनाथन 30 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीतील नेल्सन मंडेला मार्गावर हत्या करण्यात आली. त्यावेळी सौम्या नाईट शिफ्ट करून ऑफिसमधून घरी परतत होती. पोलिसांना सौम्याचा मृतदेह तिच्या कारमध्ये सापडला. या हत्येचा उलगडा होण्यासाठी पोलिसांना तब्बल 6 महिने लागले.
पाचही आरोपी मार्च 2009 पासून कोठडीत
हत्येमागे दरोडा असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. रवी कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी या पाच जणांना हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि ते मार्च 2009 पासून कोठडीत आहेत. पोलिसांनी आरोपींवर मकोका लावला होता. मलिक आणि इतर दोन आरोपी रवी कपूर आणि अमित शुक्ला यांना 2009 मध्ये आयटी व्यावसायिक जिगिशा घोष यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या