मेहबूबा मुफ्ती यांच्या तिरंग्याबद्दलच्या वक्तव्यानं काश्मीरचं राजकीय वातावरण पेटलं
कलम 370 रद्द केल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर काश्मीरचं राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. कारण जे नेते आतापर्यंत कैदेत होते, त्यांची सुटका झाली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर तिथलं राजकारण पुन्हा पेटलं आहे.
श्रीनगर : कलम 370 रद्द केल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर काश्मीरचं राजकारण पुन्हा तापू लागलं आहे. कारण जे नेते आतापर्यंत कैदेत होते, त्यांची सुटका झाली आहे. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिरंग्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर तिथलं राजकारण पुन्हा पेटलं आहे. भाजपनं त्याविरोधात आज जोरदार आंदोलनही छेडलं.
जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एका तिरंग्यावरुन राजकारण सुरु झालंय. पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंग्याबाबत काल एक वक्तव्य केलं, त्यानंतर भाजपनं त्यावरुन जोरदार आंदोलन छेडलंय. जोपर्यंत काश्मीरचा ध्वज पुन्हा आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपण तिरंगा हातात घेणार नाही असं वक्तव्य मेहबुबा मुफ्ती यांनी केलं होतं आणि त्यावरुनच काश्मीरचं राजकीय वातावरण तापलंय.
सव्वा वर्षे कैदेत काढल्यानंतर अगदी पंधरा दिवसांपूर्वीच मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्यात आलीय. त्यानंतर फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीरमधले सर्व प्रादेशिक पक्ष एकवटले आहेत. सगळे एकमुखानं कलम 370 पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत. मेहबूबा मुफ्ती यांनी सुटकेनंतरच्या पहिल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं.
26 ऑक्टोबर हा दिवस काश्मीरमध्ये भाजपच्या वतीनं विलय दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 ऑक्टोबर 1947 ला काश्मीरच्या विलिनीकरणावर सही झाली होती. भाजप हा दिवस साजरा करण्याच्या बेतात असतानाच मेहबुबा मुफ्तींच्या वक्तव्यामुळं त्याला वेगळं वळण लागलं. जम्मूमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा जोरदार निषेध तर केलाच, पण जम्मू काश्मीरचा ध्वजही जाळून टाकला.
मोदी सरकारनं मागच्या वर्षी कलम 370 काढून घेतलं. त्यानंतर काश्मीरमध्ये सर्व सरकारी कार्यालयात फक्त तिरंगाच फडकू लागला. जम्मू काश्मीरच्या स्वतंत्र घटनेचंही महत्व राहिले नाही. त्यामुळे एक राष्ट्र एक विधान या भाजपच्या ऐतिहासिक स्वप्नाचीही पूर्तता झाली होती.
मेहबूबा मुफ्ती यांच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याबद्दल राजद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी भाजप नेते करत आहेत. पण त्यांच्या बचावाला माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आले आहेत. आम्ही भाजपविरोधी आहोत, राष्ट्रविरोधी नाहीत असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं आहे.
कलम 370 लागू करण्याच्या एक दिवस आधीपासूनच केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधल्या सर्वपक्षीय नेत्यांची धरपकड केली होती. गेले सव्वा वर्षभर हे नेते कैदेत होते. पण आता जेव्हा त्यांची सुटका झालीय, त्यानंतर या मुद्द्यावरुन राजकारण तापवलं जातंय. आता हे कुठल्या वळणावर जाणार याचं उत्तर लवकरच कळेल.