Manoj Kumar : खादीला 'लोकल टू ग्लोबल' बनवण्याचा प्रयत्न करणार : मनोज कुमार
भारतीय खादीला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) नवनियुक्त अध्यक्ष मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी व्यक्त केले.
Khadi and Village Industries Commission : भारतीय खादीला नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) नवनियुक्त अध्यक्ष मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ, सबका विकास' आणि 'खादी फॉर नेशन, खादी फॉर फॅशन, खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशन' या मंत्राचा अवलंब करुन भारतीय खादीला नव्या उंचीवर नेणार आहे. खादीला 'लोकल टू ग्लोबल' बनवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. मनोज कुमार यांनी 15 जुलै 2022 रोजी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर प्रथमच त्यांनी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या मुंबईतील मुख्यालयला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
खादीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देऊ
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकार्यांना संबोधित करताना अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'आत्मनिर्भर भारताचे' स्वप्न साकार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लघु आणि सूक्ष्म उद्योग स्थापन करण्याचे उद्दीष्ट आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या विविध योजनांद्वारे स्वयंरोजगार निर्माण करुन स्वावलंबी भारत निर्माण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सागंतिले. गेल्या काही वर्षांत भारतात खादी पुन्हा लोकप्रिय झाली असून, खादीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याला आपण प्राधान्य देऊ असेही मनोज कुमार यांनी सांगितले.
प्रत्येक हाताला काम मिळावं
खादीला 'लोकल टू ग्लोबल' बनवण्याचा आणि भारताच्या स्वदेशी उत्पादनांची जगभरात मागणी वाढवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे कुमार म्हणाले. यामुळं खादी आणि ग्रामोद्योग आयोगाशी संबंधित अधिकाधिक कारागिरांच्या हातात पैसा पोहोचेल याची खात्री होईल. जेणेकरून त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि समाजाच्या शेवटच्या टप्प्यावर उभे असलेले कारागीर आर्थिक विकासाचा भाग बनून स्वावलंबी होतील, असेही ते म्हणाले. प्रत्येक हाताला काम मिळावे आणि कामाची रास्त किंमत मिळावी, असा आयोगाचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी आयोगाकडून राबविण्यात येणारे उपक्रम आणि योजना लवकरच सुलभ करण्यात येणार आहे. खादी उत्पादने ग्राहकांना अधिक सुलभतेने उपलब्ध करुन देण्यासाठी आयोगाकडून एक ई-कॉमर्स उपक्रमही हाती घेण्यात आला असून, त्यात आणखी सुधारणा केल्या जातील असेही मनोज कुमार यांनी सांगितले.