गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरच राहतील : अमित शाह
मुख्यमंत्री पर्रिकर यांनी प्रकृती ठीक नसल्याने पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
पणजी : गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकर हेच कायम राहतील,असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज ट्वीट करून स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री पर्रिकर यांनी प्रकृती ठीक नसल्याने पक्षश्रेष्ठींकडे मुख्यमंत्री पद सोडण्याची इच्छा बोलून दाखवली होती.
काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी 3 निरीक्षक पाठवून पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसं चालवायचं याबाबत भाजप आणि आघाडीच्या आमदारांची तसेच भाजप कोअर कमिटीची मते जाणून घेतली होती. त्यानंतर गेल्या आठवड्याच्या अखेरीस भाजपचे 3 खासदार आणि गोव्यात पाठवलेल्या 3 निरीक्षकांसोबत एकत्र बैठक घेऊन विविध पर्यायांचा आढावा घेतला होता.
त्यानंतर 2 दिवसात शाह आपला निर्णय कळवतील अशी शक्यता बैठकीत सहभागी झालेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार विनय तेंडुलकर यांनी वर्तवली होती. गेले दोन दिवस गोव्यात सगळेच शहा यांच्या निर्णयाची प्रतिक्षा करत होते. त्यानुसार आज शाह यांनी आज ट्वीट करून मुख्यमंत्रीपदी पर्रिकर हेच कायम राहतील, हे स्पष्ट केलं.
गोवा प्रदेश भाजपा की कोर टीम के साथ चर्चा कर यह निर्णय लिया गया है कि गोवा के मुख्यमंत्री श्री @manoharparrikar जी ही गोवा सरकार का नेतृत्व करते रहेंगे।
प्रदेश सरकार के मंत्रिमंडल व विभागों में बदलाव शीघ्र ही किया जाएगा। — Amit Shah (@AmitShah) September 23, 2018
मंत्रिमंडळ फेरबदल आणि खातेवाटप लवकरच केले जाईल असे शाह यांनी स्पष्ट केलं आहे. नेतृत्व बदलाची चर्चा सुरु झाल्यापासून भाजप आघाडीचे घटक पक्ष असलेले गोवा फॉरवर्ड आणि मगो एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नव्हते. त्या पार्श्वभूमीवर पर्रिकर हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील आणि त्यांच्याकडील अतिरिक्त खाती घटक पक्षांमध्ये वाटली जातील अशी शक्यता वर्तवली जात होती.
त्यानुसारच शाह यांनी निर्णय घेतल्याचं मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकांसाठी भाजपला घटक पक्षांची आणि अपक्षांची मदत अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असल्याने घटक पक्ष कोणत्याही कारणाने दुखावले जाणार नाहीत याची खबरदारी भाजप नेते घेतील, हे सगळ्यांनी गृहीत धरले होते.