Manipur Attack on Assam Rifles: मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ट्रकवर दहशतवाद्यांचा हल्ला, 2 जवान शहीद, तीन जखमी
Manipur Attack on Assam Rifles: बंदूकधारी व्यक्तींच्या एका गटानं आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. यात दोन जवान शहीद झाले आहेत.

इम्फाळ : मणिपूर राज्यातील विष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी 6 वाजता घडली. आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Manipur Attack on Assam Rifles: आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला
या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांनी म्हटलं की मणिपूरच्या विष्णूपर जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एक जेसीओ आणि एका जवानाचा समावेश आहे. आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर दहशतवादी एका पांढर्या व्हॅनमधून पळून गेले. आसाम रायफल्सच्या जवानांनी संयमानं प्रत्युत्तराची कारवाई केली. यात सामान्य नागरिकांना इजा होऊ नये याची काळजी घेण्यात आली. सरक्षा दलांनी या दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी अभियान सुरु केलं आहे.
राज्यपालांकडून घटनेचा निषेध
मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. राजभवनाकडून जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार आसाम रायफल्सचे दोन जवान देशाचं संरक्षण करताना शहीद झाले. राज्यपालांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी,अशी प्रार्थना करत असल्याचं सांगण्यात आलं. याशिवाय अशा भ्याड हल्ल्यांना सहन केलं जाणार नाही, असंही सांगितलं.
Two Assam Rifles personnel, including one JCO and one jawan, were killed in an attack by terrorists in the Bishnupur district of Manipur. Two jawans are injured. The terrorists escaped in a white van after attacking the vehicle in which the troops were travelling on a busy road.… https://t.co/UOgaDOEGGo
— ANI (@ANI) September 19, 2025
माजी मुख्यमंत्री बिरेन सिंह काय म्हणाले?
मणिपूरचे माजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ते म्हणाले की आमच्या 33 आसाम रायफल्सच्या बहादूर जवानांवरील हल्ला दु:खद आहे. दोन जवान शहीद झाले आणि इतर तिघे जखमी झाल्यानं धक्का बसल्याचं बिरेन सिंह म्हणाले. शहीदांचं शौर्य आणि बलिदान नेहमी लक्षात ठेवलं जाईल. गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळावी, असं बिरेन सिंह म्हणाले.
दरम्यान, हा हल्ला मोठ्या कटाचा भाग असू शकतो, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आसाम रायफल्सचा ताफा ज्या मार्गानं जाणार होता त्या मार्गावरील सुरक्षेत चूक झाली का याचा शोध घेतला जात आहे.
























