(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे दुहेरी जबाबदारी, काँग्रेस अध्यक्ष पदासह राज्यसभेत विरोधी पक्षनेते
Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सध्या दुहेरी जबाबदारी आहे. मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असण्यासोबतच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते ही आहेत.
Mallikarjun Kharge : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यावर सध्या दुहेरी जबाबदारी आहे. मल्लिकार्जुन खर्गे सध्या काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यासोबतच त्यांच्यावर राज्यसभेच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारीही आहे. खर्गे हे सध्या राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी कायम राहण्याची शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना त्यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस जयराम रमेश यांना खर्गेंबद्दल विचारले असता त्यांनी सांगितलं की, 'काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यासोबतच ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही कायम राहतील आणि विरोधी पक्षांसोबत मिळून काम करतील.' शनिवारी संध्याकाळी सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या संसदीय रणनीती गटाच्या बैठकीत खर्गे यांना विरोधी पक्षनेतेपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
खर्गे यांनी पाठवला आहे विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा
जयराम रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, “सोनिया गांधी आमच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षा आहेत आणि मल्लिकार्जुन खर्गे पक्षाचे अध्यक्ष आहेत. समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊ शकत नाही. यासंदर्भात जी काही पावले उचलावी लागतील, ती आमच्या संसदीय पक्षाच्या प्रमुख ठरवतील. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवताना खर्गे यांनी ऑक्टोबर महिन्यामध्येच सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार की, काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी होत असून ते संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार नाहीत, त्यामुळे विरोधी पक्षनेते पदाबाबत सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. या पदाच्या दावेदारांमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, पी चिदंबरम आणि केसी वेणुगोपाल यांचा समावेश आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी ऑक्टोंबर महिन्यामध्ये काँग्रेस अध्यक्षपदाच्या लढाईत शशी थरूर यांचा पराभव करत विजय मिळवला. खर्गे यांच्या रुपात काँग्रेस पक्षाला 24 वर्षांनंतर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्ती अध्यक्ष म्हणून लाभला आहे. मल्लिकार्जून खर्गे 80 वर्षांचे आहेत. ते मुळचे कर्नाटकचे आहेत. काँग्रेस पक्षाच्या 137 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये खर्गेंचा विजय झाला. खर्गे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी गुजरात निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे बाकी नेते भारत जोडो यात्रेमध्ये व्यस्त आहेत.