यावर्षी थंडीचा पॅटर्न वेगळाच, दिवसा थंडी पहाटे मात्र कमी; हवामानाची नेमकी परिस्थिती काय?
8 डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याच्या थंडीला जरी सुरुवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
Weather : सध्या देशातील हवामानात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडी आहे तर कुठं ढगाळ वातावरण आहे, तर काही भागात अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. दरम्यान, 2023 च्या एल-निनो वर्षात दर वर्षासारखी थंडी नाही. यावर्षी ती कशी वळण घेऊ शकते, हे बघणेही गमतीशीर आहे. 8 डिसेंबरपासून डिसेंबर महिन्याच्या थंडीला जरी सुरुवात झाली असली तरी, सध्याचा थंडीचा पॅटर्न जरा वेगळाच जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. सध्या दिवसा थंडी वाजत असून, त्यामानाने पहाटेचा गारवा कमीच असल्याची माहिती खुळे यांनी दिली. सध्याच्या हवामानाबाबत माणिकराव खुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
दुपारचे सध्याचे कमाल तापमान व त्याचा परिणाम
विदर्भ वगळता, कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात सध्या दुपारचे कमाल तापमान हे 27 डिग्री से. ग्रेडच्या तर विदर्भात 25 डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. म्हणजेच दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा विदर्भात जवळपास 4 डिग्री से. ग्रेडने तर कोकणासहित उर्वरित महाराष्ट्रात 2 डिग्री से. ग्रेडने कमी आहे. दुपारच्या तापमानातील ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी गिरावट आहे. त्यामुळं दिवसा चांगलीच थंडी तर वाजतेच आहे. निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशाला अडथळा नाही. सूर्यप्रकाश भरपूर असला, तरीदेखील ह्या दिवसात दिवसाची लांबीही कमी असते. म्हणूनच खालावलेल्या कमाल तापमानामुळं दैनिक सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खुप आणि खुपच घसरलेली आहे. त्यामुळेच साहजिकच सध्या दमटपणा कमी जाणवत आहे. हवेत कोरडेपणा वाढला आहे. म्हणून तर सध्या पहाटेच्या किमान तापमानातही वाढ होऊनही सकाळी थंडी जाणवतच आहे.
पहाटेचे सध्याचे किमान तापमान व त्याचा परिणाम
खरतर डिसेंबर हा अति थंडीचा महिना मानला जातो. थंडीच्या तीव्रता मोजण्याचा (म्हणजे थंडी कमी किंवा जास्त ) हा ' किमान तापमान किती आहे?' हेच ठरवते. म्हणजे थंडी तीव्रता ठरवण्याचा निर्देशक घातांक किमान तापमानच आहे. सध्याचे किमान तापमान हे सरासरी इतके किंवा त्यापेक्षा कमी असावयास हवे. तरच चांगली थंडी जाणवते. परंतू, यावर्षी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे 17 डिग्री से. ग्रेडच्या दरम्यान जाणवत आहे. हे दरवर्षीच्या सरासरी तापमानापेक्षा कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात 2 डिग्री से. ग्रेडच्या तर उर्वरित महाराष्ट्रात जवळपास 4 डिग्री से. ग्रेडने अधिक आहे. त्यामुळं थंडी जाणवण्यास सुरुवात झाली पण त्याचा म्हणावा तसा कडाका जाणवत नाही.
डिसेंबरची सध्याची सापेक्ष आर्द्रता व त्याचा फायदा
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या डिसेंबर महिन्यात दैनिक सापेक्ष आर्द्रता सकाळच्या वेळेस 75 ते 85 टक्क्यांच्या आसपास तर दुपारनंतरची सापेक्ष आर्द्रता ही 55 ते 65 दरम्यान जाणवत आहे. दरवर्षीच्या डिसेंबर महिन्यातील सरासरी सापेक्ष आर्द्रतेपेक्षा जवळपास १० ते २० टक्क्यांनी कमी आहे. ही ठळक व स्पष्ट जाणवणारी मोठी गिरावट आहे. त्यामुळं दिवसा चांगलीच थंडी तर वाजतेच पण निरभ्र आकाशामुळे सूर्यप्रकाशाला अडथळा नसल्यामुळं तोही भरपूर असला तरी, ह्या दिवसात दिवसाची लांबीही कमी असते. अशा परिस्थितीत दैनिक सापेक्ष आर्द्रताही सरासरीपेक्षा खुप आणि खुपच घसरली आहे. साहजिकच दमटपणा कमी आहे. हवेत कोरडेपणा वाढला आहे आणि म्हणून सध्या वाढलेल्या किमान तापमानातही सकाळी थंडी वाजत आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे वहनही कमी
उत्तर भारतात एकापाठोपाठ पश्चिमी झंजावात वायव्येकडून पूर्वेला मार्गस्थ होत आहे. त्यामुळं तिथे थंडी व बर्फ पडत आहे. परंतू, ती थंडी खेचण्यासाठी पुरेसे कमी दाब क्षेत्रे महाराष्ट्रात नसल्यामुळं ईशान्यकडील वारे कमकुवत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या भू-भागावर मूळ स्रोताचे थंड वारे लोटले जात नाही. म्हणून कडाक्याच्या थंडीचा अभाव दिसत आहे. सध्या प्रतिकूल वातावरणामुळे सकाळी दव किंवा बादड विशेष पडत नाही.
थंडीचा हा पॅटर्न कदाचित संपूर्ण हिवाळ्यात म्हणजे फेब्रुवारी अखेरपर्यंत असाच राहू शकतो. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होणारी गारपीटही कमी होऊ शकते. दव, बादड पडण्याचे प्रमाणही कमी राहू शकते. या महिन्यअखेरपर्यंतच चक्रीवादळ आणि आयओडीचा काळ असून, नंतर संपणार आहे. एल-निनो त्याच्या तीव्रतेत असल्यामुळं डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असुन झाला तरी तो डिसेंबर महिन्याच्या मासिक सरासरीपेक्षा कमी असु शकतो.
महत्त्वाच्या बातम्या: