राज्यात सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रीपद? या नावाची चर्चा
राज्यात सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर शिंदे गट हा सध्या राष्ट्रीय पातळीवर एनडीएचा सगळ्यात मोठा घटक आहे.
Maharashtra Polical Crisis : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) स्थापन झालं. आता मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाची सत्ता राज्यात आहे. आता केंद्रात देखील शिंदे गटाला स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे. राज्यात सत्तेचा वाटा मिळाल्यानंतर शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रीपद मिळणार असल्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांनी साथ सोडल्यानंतर शिंदे गट हा सध्या राष्ट्रीय पातळीवर एनडीएचा सगळ्यात मोठा घटक आहे.
शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी केंद्रात विस्तार होऊन शिंदे गटाला सामावले जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रीपदासाठी प्रतापराव जाधव यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. एका कॅबिनेट सोबत अजून एक राज्यमंत्रीपद देखील मिळणार का याची उत्सुकता लागून आहे.
जर प्रतापराव जाधव यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं तर विदर्भातून केंद्रात मंत्री होणारे दुसरे मंत्री असतील. यानिमित्तानं बुलढाणा जिल्ह्याला मोठ्या अपेक्षा देखील लागल्या आहेत. प्रतापराव जाधव यांनी सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यांनी सलग तीन वेळा खासदारकी जिंकली आहे.
शिंदे यांनी शिवसेनेतून बंडाळी केल्यानंतर 40 आमदारांसह 12 खासदार देखील त्यांच्यासोबत असल्याचा दावा केला आहे. यात प्रतापराव जाधव यांचा देखील समावेश आहे. संसदेत शिंदे गटाचे नेते म्हणून खासदार राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रतोद म्हणून भावना गवळी आहेत.
उद्धव ठाकरे हे भाजपसोबत असताना केंद्रात शिवसेनेला प्रत्येक वेळी मंत्रीपद दिलं आहे. अनंत गीते यांच्यानंतर अरविंद सावंत यांना केंद्रात कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळालं. मात्र भाजपसोबत बिघाडी झाल्यानंतर अरविंद सावंतांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आमदारांचा मोठा गट फोडून पुन्हा भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळं राज्यासह केंद्रातली देखील समीकरणं बदलली आहेत. आता जर केंद्रात शिंदे गटातील खासदाराला मंत्रिपद मिळालं तर राज्याला एक नवा केंद्रीय मंत्री मिळण्याची शक्यता आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी, आता खातेवाटपाची प्रतीक्षा
शिंदे फडणवीस सरकारचा विस्तार 40 दिवसांनी पार पडला. मात्र आता खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. राधाकृष्ण विखे पाटील , सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा हे शपथबद्ध झाले. यात देखील शिंदे गटाला कोणती खाती मिळतात याकडे लक्ष लागून आहे.
महत्त्वाच्या बातम्या: